सांगली : राज्यातील अनेक जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसून येत नाहीत. बदलापूरमधील एका शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अनेक जिल्ह्यात नागरिक रस्त्यावर उतरले होते, त्यानंतर शासनानेही गंभीर दखल घेत आरोपीला अटक केली होती. दरम्यान, आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला असूनही महिलांवर अत्याचार व लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. आता, सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन तिचा मृतदेह घरातील पेटीमध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामधील करजगे गावामध्ये 4 वर्षांच्या बालिकेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा खून बलात्कार करून झाल्याचा दाट संशय असून पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच ते स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळळी-पुजारी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संशयित आरोपी पांडुरंग कळळी-पुजारी हा बालिकेच्या घराशेजारी राहण्यास आहे. संबंधित बालिका गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती, नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे बालिका बेपत्ता झाल्याबाबत गावात दवंडी पिटवून शोध सुरू करण्यात आला होता. याप्रकरणी, बालिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील गावात दाखल झाले. पोलिसांकडून यावेळी शोध घेतला असता पांडुरंग कळळी-पुजारी हा संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याच्यावर संशय बळवल्याने त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरातील एका पत्र्याच्या पेटीमध्ये मृतावस्थेत संबंधित बालिका मिळून आली. पोलिसांनी पांडुरंग कळळी-पुजारी याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बालिकेचा खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, या घटनेनंतर गावातील नागरिकांकडून संपात व्यक्त होत असून बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा
आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला