Sangli Crime : सांगली (Sangli) जिल्ह्याच्या तासगाव (Tasgaon) तालुक्यातील मणेराजुरीत 15 जुलै रोजी किरकोळ बाचाबाचीतून कुऱ्हाड आणि चाकूने वार करत एकाची हत्या (Murder) केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या खुनातील मुख्य संशयित आरोपीनेच विष पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अटकेच्या भीतीतून संशयित आरोपीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.
तासगाव तालुक्यातील मणेराजुरीत 15 जुलै रोजी किरकोळ कारणावरुन झालेला वाद वाढला. त्यानंतर कुर्हाड आणि चाकूने साहेबराव चंद्रकांत शिदगणेश (वय 37 वर्षे) याचा खून करण्यात आला होता. तासगाव पोलिसात या खुनाप्रकरणी रोहन्या माने, बापूसो चव्हाण आणि लखन कांबळे (सर्व रा. मणेराजुरी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील रोहन्या माने, बापूसो चव्हाण हे संशयित पोलिसांच्या ताब्यात होते. मात्र त्या खुनातील मुख्य संशयित आरोपी लखन कांबळे हा अद्याप फरार होता. लखनने द्राक्षबागेवरील विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आलं आहे. गव्हाण रोडवरील मुख्य साठवण तलावाशेजारील पंपहाऊसजवळ लखनचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
मयत साहेबराव आणि संशयित लखन कांबळे याच्यात शुक्रवारी (15 जुलै) सायंकाळी मणेराजुरी बस स्थानक चौकात जोरदार बाचाबाची झाली होती. यावेळी काहींनी मध्यस्थी करुन त्यांना घरी जाण्यास सांगितले होते. मात्र यावेळी संशयितांनी बघून घेण्याची धमकी दिली होती. रात्री उशिरा साहेबराव हा गव्हाण रस्त्यावरील समाज मंदिरात यात्रेनिमित्त असणाऱ्या जेवणासाठी गेला होता. पुन्हा त्यांच्यात वाद उफाळून आला. समाज मंदिरासमोर संशयित आणि मयत साहेबराव हे एकमेकांशी वाद घालत होते. त्यावेळी साहेबरावला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खाली पाडल. मग त्याच्यावर कुऱ्हाड, चाकू आणि कोयत्याने सपासप वार केले. चाकूने बरगडीजवळ दोन वार वर्मी लागल्याने साहेबराव जागेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. लखनने कुऱ्हाडीने डोक्यात तर बापूसो याने कोयत्याने वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन साहेबरावचा मृत्यू झाला.