Sangli Crime : पाळत ठेवत चारचाकीची काच फोडून चार लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सांगली (Sangli) शहरात समोर आली असून दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाले आहेत. सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्यानजीक ही घटना घडली. इथल्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या चारचाकीची काच फोडून डिक्कीत ठेवलेली चार लाख रुपयांची रोकड दोन चोरट्यांनी लंपास केल्याचं दिसतं. दोन्ही चोरटे दुचाकीवरुन पलायन करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विश्रामबाग पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.


कशी घडली चोरी?
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अमोल अशोक चौगुले यांनी फिर्याद दिली आहे. अमोल चौगुले यांचा संगणक विक्रीचा व्यवसाय आहे. शिरोळ इथल्या दोन बँकांमध्ये त्यांची खाती आहेत. अमोल चौगुले हे मंगळवारी (29 नोव्हेंबर) रोजी अरुण हडपत या चालकासह चारचाकीने  शिरोळ इथे गेले होते. तिथल्या बँकांमधून त्यांनी 3 लाख 90 हजार रुपयांची रोकड काढली. सर्व रक्कम चारचाकीतील चालकाच्या सीटनजीक असणाऱ्या डॅशबोर्डच्या डिकीत ठेवली. शिरोळवरुन येताना ते विश्रामबाग परिसरातील शंभर फुटी रस्त्यावरील वळणावर थांबले होते. तिथे चारचाकी लॉक करुन ते काही कामानिमित्त चालत जवळच गेले होते. याचा फायदा घेत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी प्रथम गाडीच्या मागील बाजूकडील काच फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अशयस्वी ठरल्याने त्यांनी पुढील बाजूची काच फोडली आणि डिकीचे कुलूप तोडून त्यातील 3 लाख 90 हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा प्रकार घडला. 




सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद
अमोल चौगुले काही वेळात तिथे आले असता त्यांना गाडीची काच फोडल्याचे तसेच डिक्कीतील रोकड गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून दोघे चोरटे दुचाकीवरुन पलायन करताना दिसत आहेत. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


ओळखीच्या व्यक्तीने चोरी केली? 
दरम्यान, ही चोरी ओळखीच्या व्यक्तीने केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमोल चौगुले बँकांमधून एवढी मोठी रक्कम काढणार असल्याची माहिती चोरांना असावी. या दोन्ही चोरांनी अमोल चौगुले यांच्यावर पाळत ठेवली होती. ते कारमधून बाहेर जाताच त्यांनी संधी साधली आणि गाडीतील रक्कम चोरुन पोबारा केला. विश्रामबाग पोलीस आता या चोरीचा तपास करत असून चोरट्यांच्या अटकेनंतरच चोरीचा खरा उद्देश आणि चोर कोण होते, याबाबतची माहिती समोर येईल.