Sanglin News: सांगली जिल्ह्यातील जतमधील माजी भाजप नगरसेवक विजय ताड यांच्या हत्येचा उलघडा झाला आहे. माजी भाजप नगरसेवक उमेश सावंत यानेच हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे. या खुनाचा मुख्य सूत्रधार भाजपचाच माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचे समोर आले आहे. मात्र, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला? ते स्पष्ट झाले नसल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. खून करणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.


बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने, आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत. माजी नगरसेवक उमेश सावंत फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. तपासासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी पाच जणांची नावे समोर आली आहेत. 


दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या, डोक्यात दगहडी घातला


जतमध्ये 17 मार्च रोजी भरदिवसा भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. विजय ताड हे दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असता सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे ही घटना कोणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. यापप्रकरणी सांगली पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला होता.


दरम्यान, मृत माजी नगरसेवक विजय ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीमध्ये संदीप उर्फ बबलू चव्हाणने त्याच्या साथीदारासोबत आपल्या भावावर गोळ्या झाडून आणि दगड घालून खून केल्याची तक्रार दिली आहे. त्याचबरोबर फिर्यादीमध्ये जत भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत यांचाही उल्लेख करण्यात आला होता. विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला होता, असे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता हे समोर आले आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :