Sand Mafia Attack on Revenue Squad : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वाळू माफियांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून, आता त्यांची हिंमत एवढी वाढली की थेट महसूलच्या पथकावर हल्ला (Sand Mafia Attack) करण्यात येत आहे. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठीला चक्क ट्रॅक्टरच्या टायरखाली टाकण्याचा प्रयत्न हिंगोलीत (Hingoli) करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत पंढरपूरच्या (Pandharpur) महसूल पथकाला (Revenue Squad) तलवारीचा धाक दाखवून हल्ला करण्यात आला आहे. ज्यात पथकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. 


पहिली घटना हिंगोली जिल्ह्यात समोर आली आहे. जिल्ह्यातील चीचोली गावांमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठीला आणि कोतवाल यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, तलाठी जगदीश दिनकर कुलकर्णी ( वय 41 वर्ष) यांच्याकडे चिंचोली गावाचा पदभार आहे. दरम्यान, याच गावात मागील काही दिवसांपासून अवैध वाळूची वाहतूक सुरु असल्याने कुलकर्णी हे सहकारी कोतवाल यांना घेऊन कारवाईसाठी गेले होते. यावेळी त्यांना ज्ञानेश्वर पतंगे यांच्यासह दोन लोकं अवैध वाळूची वाहतूक करतांना मिळून आले. त्यामुळे तलाठी कुलकर्णी यांनी संबंधित ट्रॅक्टर पकडून कारवाई सुरु केली. त्यामुळे चिडलेल्या ज्ञानेश्वर पतंगे आणि त्यांच्या चालकासह दोन अनोळखी लोकांनी कुलकर्णी यांना मारहाण केली. तसेच कोतवाल यांचा मोबाईल देखील हिसकावून घेतला. धक्कादायक म्हणजे तलाठी कुलकर्णी यांना थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालण्याचा प्रयत्न झाला. यावेळी झालेल्या झटापटीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 


तलवार घेऊन पथकाला धमकावले, गाडीही फोडली...


हिंगोलीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर थेट हल्ला करण्यात आला आहे. चंद्रभागा पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर तहसील पथक कारवाईसाठी गेले होते. दरम्यान, गुरसले येथे कारवाईला पथक आल्याचे लक्षात येताच वाळू माफियांनी चक्क हातात तलवार घेऊन पथकाला धमकावले. तसेच, जेसीबी आणि टीपर पळवून नेले. धक्कादायक म्हणजे कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा वाळू माफियांची दहशत पाहायला मिळत आहे. 


तलाठ्याला ट्रॅक्टरखाली टाकतांनाचा व्हिडिओ व्हायरल...


हिंगोली जिल्ह्यातील चीचोली गावांमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठीला आणि कोतवाल यांना मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाळू माफियांकडून तलाठीला ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तसेच, या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! बुलढाण्यात महाप्रसादातून पाचशेपेक्षा अधिक जणांना विषबाधा; रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु