मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ही दोन नावे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी विश्वात आणि माध्यमांमध्ये सातत्याने झळकत आहेत. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई हे नाव पुन्हा चर्चेत आले, तर अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबारामुळे बिश्नोई गँगकडूनच बाबा सिद्दीकींची (Baba siddique) हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कायद्यान्वये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood) आणि लॉरेन्स बिश्नोई हे दोघेही गंभीर गुन्हेगार आहेत. मात्र, या दोघांचे अनुकरण करण्यासाठी काही तरुणाई पुढे येत आहे. विशेष म्हणजे या दोघांचे अनुकरण करणारे टी-शर्ट आणि वापरातील वस्तूंची खुलेआम विक्री होत असल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर सायबर गुन्हे विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. संबधित वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई कॉमर्स वेबसाईटवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


दाऊद इब्राहिम व गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट प्रिंट करुन त्याची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित ई-कॉमर्स वेबसाईट आणि विक्रेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Flipkart, AliExpress, TeeShopper आणि Etsy सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरुन गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट विक्री करण्यात आले आहेत. यांसारखे उत्पादन हे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचं काम करत आहेत. तरुणाईवर नकारात्मक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे, यांसारख्या वस्तू समाजिक मुल्यांचं अध:पतन करणाऱ्या असून समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणाऱ्या आहेत. तसेच, तरुणाई वाईट मार्गाला जाऊन एका पिढीचं आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सायबर क्राईमने गंभीर दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


महाराष्ट्रा सायबर विभागाने फ्लिपकार्ट, अलीएक्सप्रेस, टीशॉपर आणि एट्सी यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईट व विक्रेता प्लॅटफॉर्मवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 च्या कलम 192, 196, 353, 3 आणि आयटी अधिनियम, 2000 च्या धारा 67 अन्वये एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे, यापुढे अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाऊ शकते. 


हेही वाचा


शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?