मुंबई : राज्य सरकारकडे पैसे थकल्यानंतर 17 मुलांना ओलिस ठेवल्यानंतर एन्काऊंटर (Rohit Arya Encounter) झालेल्या रोहित आर्यचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रोहित आर्यचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी रोहित आर्यच्या कुटुंबातील एक व्यक्ती शवविच्छेदन कक्षबाहेर उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय गुन्हे शाखेचे पोलिसही त्या ठिकाणी उपस्थित होते.
रोहित आर्यचे संपूर्ण शवविच्छेदन हे व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच हा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूबाबत पुढील गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोहित आर्यचा एन्काऊंटर हा बनावट होता की रियल होता हेदेखील स्पष्ट होणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास रोहित आर्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कक्षात घेण्यात आला. त्यानंतर सुमारे दोन तास ही शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याविषयी अधिक स्पष्टता येणार आहे.
Rohit Arya News : एन्काऊंटर फेक?
दरम्यान, रोहित आर्यने मुलांना ओलिस ठेवलेल्या स्टुडिओतून पोलिसांनी पिस्टल, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्यूशन आणि लायटर जप्त केलं आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी मृत आरोपी रोहित आर्यवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
मुंबई पोलिसांनी केलेल्या रोहित आर्यच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एन्काउंटर बनावट असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मात्र लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी केलेला एन्काऊंटर योग्यच असल्याचं माजी पोलीस अधिकारी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी म्हटलं.
Rohit Arya Encounter : रोहित आर्यचे एन्काऊंटर
मुंबईच्या पवईत गुरुवारी थरारक ओलीसनाट्य रंगलं. ऑडिशनच्या नावाखाली मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचं एन्काऊंटर झालं. मात्र, या एन्काऊंटरभोवती संशयाचा धूर निर्माण झाला. एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप वकील नितीन सातपुतेंनी केला. तसंच सरकारच्या भूमिकेवरही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. सरकारनं कंत्राटाचे पैसे थकवल्याचा आरोप रोहित आर्यनं केल्यानंतर आता विरोधकांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केलं. त्यामुळे कंत्राटदारांच्या थकलेल्या बिलाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
Rohit Arya News : एकेकाळी सरकारचा पोस्टर बॉय
मुंबईच्या पवईतील ओलीसनाट्यामुळे एकच खळबळ उडाली. ऑडिशनसाठी आलेल्या 17 मुलांना रोहित आर्यनं ओलीस ठेवलं होतं. तेव्हापासून रोहित आर्य सगळीकडे चर्चेत आहे तो शाळकरी मुलांचा अपहरणकर्ता म्हणून. पण याच रोहित आर्यची शाळकरी मुलांसाठीच्या सरकारी योजनेचा जनक अशी आधीची ओळख आहे.
डिसेंबर 2023 मध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना' सरकारनं सुरू केली. योजनेनुसार विद्यार्थ्यांना 'क्लीननेस मॉनिटर' ची भूमिका देण्यात आली होती. या योजनेतल्या 'स्वच्छता मॉनिटर 2023' चं सगळं काम 'लेट्स चेंज' प्रोजेक्टचा संचालक रोहित आर्यकडे देण्यात आलं होतं. या योनेबद्दल रोहित आर्यचं पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं होतं.
ही बातमी वाचा: