Continues below advertisement


मुंबई : पवईमध्ये ऑडिशनला बोलावून 17 मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर (Rohit Arya Encounter) केला. आता त्याच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी समोर आली आहे. एन्काऊंटर करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रोहित आर्यशी वाटाघाटी केल्या, त्याचे मन वळवण्याचा आतोनात प्रयत्न केला. शेवटी 17 मुलांच्या जीवाचा प्रश्न असल्याने रोहित आर्यचा एन्काऊंटर करण्यात आला. हा सगळा घटनाक्रम कसा होता याची माहिती रोहित आर्यशी स्टुडियो बाहेरून वाटाघाटी करणाऱ्या अधिकाऱ्याने एबीपी माझाला दिली.


एन्कांऊंटरपूर्वी रोहित आर्यशी पोलिसांनी संवाद साधला. 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यला बोलण्यात व्यस्त ठेऊन पोलिसांनी स्टुडिओत प्रवेश केला. शेवटी रोहित आर्य माघारीसाठी तयार नसल्याने पोलिसांनी शेवटचा पर्याय म्हणून एन्काऊंटर केला.


Mumbai Police Rohit Arya Encounter : पोलिसांनी स्वतःच्या मुलांची शपथ घेतली


रोहित आर्यच मन वळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांच्या शिकस्त केली होती. ओलिस मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांनी स्वतःच्या मुलांची शप्पथही घेतली. तसेच काही पोलिसांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती. पोलिसांसोबतच रोहित आर्यचे मन वळविण्यासाठी पालक देखील व्हिडीओ कॉलवर त्याला विनवण्या करत होते. पोलीस रोहित आर्यच्या पाया पडण्यास देखील तयार होते.


रोहित आर्यने सुरवातीला तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच नाव घेतलं होतं. पोलीस त्यांच्याशी देखील बोलणं करून देण्याच्या तयारीत होते. मात्र रोहित आर्य पॅनिक झाला. हा ड्रामा तब्बल दीड ते दोन तास सुरू होता. अखेर रोहित आर्य मानणार नसल्याचं लक्षात येताच पोलिसांनी स्टुडिओत घुसण्याचा निर्णय घेतला.


Powai Encounter : रोहितला बोलण्यात व्यस्त ठेवलं अन् ...


एकीकडे रोहित आर्यला पोलिसांनी बोलण्यात व्यस्त ठेवलं आणि दुसरीकडे मागच्या बाजूला असलेल्या बाथरुमचे ग्रील तोडून पोलिसांनी स्टुडिओत प्रवेश केला. बाथरुमच्या खिडकीतून पोलिसांनी जेव्हा स्टुडिओत प्रवेश केला, तेव्हा समोरचं चित्र पाहून पोलिसांनाही धक्का बसला.


रोहितच्या हातात एअरगन होती. या एअरगननं तो मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पण पोलीस आल्याचं समजताच त्यानं बंदुकीची दिशा पोलिसांकडे वळवली आणि गोळीबार करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार करायला सुरुवात केली. अखेर पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं रोहित आर्यच्या छातीचा वेध घेतला.


Rohit Arya Postmortem : रोहित आर्यचे शवविच्छेदन पूर्ण


रोहित आर्यच्या मृतदेहाचं तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आलं आहे. यावेळी रोहित आर्यच्या कुटुंबातील एक व्यक्ती शवविच्छेदन कक्षाबाहेर उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शवविच्छेदनाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर पूर्ण करण्यात आली. तब्बल दोन तास ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.


ही बातमी वाचा: