Ambernath Crime News : अंबरनाथमधील (Ambarnath) एका डॉक्टरच्या घरावर पडलेल्या दरोड्याची उकल तब्बल तीन महिन्यांनी झाली आहे. तसेच, पोलीस तपासाअंती कामावरुन काढल्याच्या रागातून एका माजी कर्मचाऱ्यानं हा कट रचल्याचंही समोर आलं आहे. 


अंबरनाथमधील (Ambarnath News) डॉ. उषा लापसिया यांच्या घरावर जुलै महिन्यात सशस्त्र दरोडा पडला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तीन महिन्यांत दरोडेखोरांचा माग काढत एका महिलेसह एकूण 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पूर्वी डॉक्टर लापसिया यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेनंच हा कट रचल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.


अंबरनाथमधील डॉक्टर उषा आणि हरीश लापसिया यांचं कानसई दत्तमंदिराजवळ उषा नर्सिंग होम हे हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर लापसिया दाम्पत्य वास्तव्याला आहे. 11 जुलै रोजी रात्री डॉ. हरीश लापसिया हे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असताना उषा लापसिया या रोजच्याप्रमाणे घराचं दार उघडं ठेवून झोपी गेल्या. यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी आधी तळमजल्यावरील पेशंट आणि नर्स यांना कोंडून ठेवलं. त्यानंतर लापसिया यांच्या घरात घुसून तिथून 1 किलो सोन्याच्या दागिन्यांसाह रोख रक्कम, हिरे असा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल लुटून नेला. जाताना हे दरोडेखोर सीसीटीव्हीचा डिव्हीआरही घेऊन गेले. त्यामुळं हे काम ओळखीतल्याच कुणाचं तरी असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र सर्व अंगांनी तपास करूनही 3 महिने शिवाजीनगर पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. त्यामुळं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय हर्षल राजपूत यांच्याकडे तपासाची सूत्रं देण्यात आली. त्यानंतर राजपूत आणि कॉन्स्टेबल मंगेश वीर यांनी आरोपींचा मग काढत त्यांना बेड्या ठोकल्या. यामध्ये डॉक्टर लापसिया यांच्याकडेच पूर्वी काम करणाऱ्या एका महिलेनं हा सगळा कट रचल्याचं समोर आलं. ज्योती सालेकर ही महिला पूर्वी लापसिया यांच्याकडे लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होती. मात्र ती रुग्णांकडून परस्पर पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर डॉक्टर लापसिया यांनी तिला कामावरून काढून टाकलं होतं. याचाच राग काढण्यासाठी ज्योतीनं तिच्या ओळखीच्या चेतन दुधाने, हरीश घाडगे, अक्षय जाधव, कुणाल चौधरी, दीपक वाघमारे, तुषार उर्फ बाळा सोळसे यांना सोबत घेत हा दरोड्याचा कट रचला आणि दरोडा टाकला. दरोडा टाकल्यानंतर जणू काही झालंच नसल्याच्या अविर्भावात हे सगळे वावरत होते. त्यात 3 महिनं होऊनही पोलीस आपल्यापर्यंत न आल्यानं आता दरोडा पचवल्याच्या आनंदात हे सगळे होते. मात्र त्याचवेळी त्यांच्यातल्याच एकानं दारू पिऊन मित्राला सांगितलेले किस्से थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आणि हे सगळे थेट गजाआड पोहोचले. या सर्वांकडून चोरीचं सोनं विकत घेणारे बाबूसिंह चदाणा आणि गोपाल रावरिया या दोन ज्वेलर्स व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत या कामगिरीची माहिती दिली.


या पत्रकार परिषदेला उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत हेदेखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर या गुन्ह्याची उकल करणारे पीएसआय हर्षल राजपूत आणि कॉन्स्टेबल मंगेश वीर यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाचा अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इतकंच नव्हे, तर या पथकाला 50 हजार रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं. पोलिसांनी उशिरा का होईना, पण या गुन्ह्याची उकल केल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त होतंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Satara Crime : महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्याला अटक