Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं ठरत आहे. एकही आमदार रणांगणाबाहेर राहू नये यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून खबरादारी घेतली जात आहे. त्यामुळे आजारी असलेले आमदारही आज मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले. या आमदारांमध्ये भाजपच्या मुक्ता टिळक, भाजपचेच लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा समावेश आहे. आमदारांनी मतदानासाठी हजर राहावं यासाठी भाजप आणि शिवसेनेने अॅम्ब्युलन्सची सोय केली होती.


मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात
पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक या मतदानासाठी आज अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात पोहोचल्या. मुक्ता टिळक कर्करोगाशी झुंज देत आहेत. तब्येत खालावलेली असतानाही मुक्ता टिळक राज्यसभेच्या मतदानासाठी आल्या होत्या. मुक्ता टिळक तीन दिवसांपूर्वीच मुंबईत आल्या होत्या. आज मतदानाच्या दिवशी त्यांना अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात आणलं. कार्यकर्ता म्हणून पक्षाचा आदेश पाळणं माझई जबाबदारी अशी प्रतिक्रिया त्यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी दिली होती.


अॅम्ब्युलन्समधून लक्ष्मण जगताप मतदानासाठी मुंबईत 
केवळ मुक्ता टिळकच नाही तर पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार देखील आज मतदानासाठी मुंबईत अॅम्ब्युलन्समधून आले. आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी जिकिरीचं ठरेल. त्यामुळे कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने अखेर ते मतदानासाठी मुंबईत आले. लक्ष्मण जगताप आज सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरी चिंचवडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. खरंतर पक्षाने एअरलिफ्ट करण्याचीही तयारी केली होती. यासाठी एअर अॅम्ब्युलन्सही तयार ठेवलेली होती, मात्र हवामानात वारंवार बदल होत असल्याने डॉक्टरांनी महामार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लक्ष्मण जगतात रस्तेमार्गाने मुंबईत दाखल झाले.


वॉकरच्या साहाय्याने आमदार महेंद्र दळवी विधानभवनात
अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी हे देखील वॉकरच्या साहाय्याने विधानभवनात पोहोचले. काही दिवसांपूर्वीच महेंद्र दळवी यांच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांची प्रकृती अद्यापही पूर्णपणे बरी झालेली नाही. परंतु राज्यसभे प्रतिष्ठेची लढाई पाहता एक एक मत मौल्यवान आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी वॉकरच्या साहाय्याने विधानभवनात पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला. 


14 वर्षांपूर्वी खासदार हरिश्चंद्र चव्हाण देखील एअर अॅम्ब्युलन्समधून संसदेत मतदानाला!




आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, महेंद्र जगताप यांच्या मतदानामुळे 14 वर्षांपूर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेची आठवण झाली. नाशिक दिंडोरी तत्कालीन खासदार असलेले हरिशचंद्र चव्हाण हे त्यावेळी अपघातात जायबंदी झाले होते. मात्र तरी देखील हरिश्चंद्र चव्हाण दिल्लीला पोहोचले होते. 2008 मध्ये संसदेत अणुकरार संदर्भात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळी भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा अपघात झाला होता. तेव्हा चव्हाण ही रुग्णवाहिकेमधून मतदानाला उपस्थित होते.


संबंधित बातम्या