Crime News :  रेल्वे मार्गालगत मृतदेह आढळून आलेल्या तरुणाच्या हत्येच्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. राजस्थानमधील सीकर येथील विद्यार्थ्यांच्या हत्येचे गूढ उकलले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वसतिगृहात जात असताना अंमली पदार्थांच्या आहारी असलेल्या आरोपी तरुणाने अनिल पर्सवाल यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर आरोपीने मृताच्या खिशातून मोबाईल, घड्याळ आणि 100 रुपये काढून पळ काढला.
 
या हत्येच्या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी जवळपास लावलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध घेतला आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीने ते मारेकऱ्यापर्यंत पोहोचले. अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याने आरोपी तरुणाने 3 डिसेंबर रोजी रात्री उशिरा कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी अनिल पर्सवाल याची हत्या केली. 


नशेच्या आहारी गेल्याने विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली


या प्रकरणी माहिती देताना उद्योग नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी सुरेंद्र सिंह डेगरा यांनी सांगितले की, 4 डिसेंबरला सकाळी पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद नगर परिसरात रेल्वे लाईनजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच उद्योगनगर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अनिल पर्सवाल असे मृत तरुणाचे नाव असून तो लोसल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमा गावचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


झुनझुनू रेल्वे लाईनच्या पलीकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना संशयास्पद तरुणाची हालचाल दिसून आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सीसीटीव्ही फुटेजबाबत आजूबाजूच्या परिसरातील लोकांची चौकशी केली. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी जुबेर शेख याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. 


पोलिसांकडून कसून तपास अन् आरोपी अटकेत


चौकशीनंतर कोचिंगचा विद्यार्थी अनिल पर्सवालच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी तो दुबईलाही मजुरीसाठी गेला होता आणि मजुरीचे काम न मिळाल्याने तो 2 महिन्यांपूर्वीच परदेशातून परतला होता. आरोपीला ड्रग्जचे व्यसन आहे. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी त्याने कोचिंगचा विद्यार्थी अनिलची लुटमारीसाठी हत्या केली असल्याचे तपासात समोर आले आहे.