पुणे : पोर्शे कार अपघातातील (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपीविरुद्ध चौकशीची परवानगी घेण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) बाल न्याय मंडळाला पत्र लिहिलं आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन चालकाने भरधाव पोर्शे कारने मोटरसायकलवरून जाणाऱ्या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन आरोपी पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा आहे.


अल्पवयीन आरोपीविरुद्ध चौकशीच्या परवानगीसाठी पत्र


अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत कार चालवत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितलं की, आम्ही जेजे बोर्डाला एक पत्र लिहून अल्पवयीन आरोपीविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितलं. यानंतर या प्रकरणावर जोरदार टीका झाल्याने, पोलिसांनी बाल न्याय मंडळात पुनर्विचार याचिका दाखल केली, त्यानंतर बोर्डाने आदेशात बदल करून अल्पवयीन आरोपीला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठवले.  


अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील


दरम्यान, विशाल अग्रवाल आणि त्याच्या वडीलांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या चालकाला चुकीच्या पद्धतीने ओलीस ठेवून त्याला पैसे आणि चैनीच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून आणि अपघाताची जबाबदारी घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने दुसऱ्याच्या नमुन्यांसोबत अदलाबदल केल्याप्रकरणी अटक केली आहे.


अल्पवयीन आरोपीचे नमुने महिलेसोबत बदलण्यात आले


पुण्यातील पोर्शे कार अपघातात आता मोठा खुलासा झाला आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना एका महिलेच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. यामध्ये आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिच्या रक्ताच्या नमुन्यासोबत मुलाच्या रक्ताचा नमुना बदलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या शिवानी अग्रवाल फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. 


आरोपीची आई शिवानी अग्रवालचा शोध सुरु


ससून रुग्णालयातील अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलले होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय अहवालाची प्रत एबीपी न्यूजला मिळाली आहे. अहवालानुसार, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना महिलेच्या रक्ताच्या नमुन्यासोबत बदलण्यात आला होता. रक्ताचा नमुना घेताना महिलेशिवाय आणखी दोन प्रौढ व्यक्तीही रुग्णालयात उपस्थित होते. आता ते दोघे कोण होते? या दोघांची ओळख पटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.