Clash in FTII : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. FTII मधील विद्यार्थी संघटनांकडून बॅनर झळकवण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
FTII मध्ये विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये बाबरी मशिदीचा उल्लेख होता. अशा स्वरूपाची बोर्ड FTII मध्ये लावण्यात आला होता. हिंदुत्वादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना हे समजलं आणि या कार्यकर्त्यांनी FTII मध्ये घुसून या बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे. FTII कॉलेजमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वादानंतर संस्थेच्या आवारातून बाबरी मशिदीचा उल्लेख असलेला बॅनर काढण्यात आला.
काही वर्षांपूर्वीदेखील FTII च्या संचालकपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले होते. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. गजेंद्र चौहान यांच्यासह या FTII च्या संचालक मंडळावर नियुक्त करण्यात आलेले सदस्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असून सिने-टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये त्यांचे फारसे योगदान नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यापेक्षा कॅम्पसचे भगवेकरण सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या मागे अतिडाव्या विचारांच्या संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपकडून मारहाणीची घटना
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) नोव्हेंबर महिन्यात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असल्याची घटना समोर आली होती. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले होते. एसएफआयकडून सभासदनोंदणी सुरू असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी केला होता. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला होता.
या घटनेच्या काही दिवसानंतर पुन्हा कॅम्पसमध्ये नवसमाजवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर भाजपशी संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती.