Pune Crime news : एकतर्फी (pune crime) प्रेमातून मुलीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) पाषाण परिसरात घडली आहे. हॉटेलमध्ये मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. या बाबत मुलीने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. अमोल नवगिरे असं आरोपीचं नाव आहे.
पाषाण भागातील एका हॉटेलमध्ये मुलगी मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. हा आरोपी मुलगा हा मुलीच्या ओळखीचा आहे. त्याने वाढदिवसाच्या कार्यक्रमात शिरुन मुलीला धमकावण्याचा प्रयत्न केला. ’तू माझी नाही झाली तर कुणाचीच होणार नाही’, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर मुलगी शांत बसली. काही वेळाने आरोपीने पुन्हा मुलीला चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. यामुळे हॉटेलमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सगळे लोक एकत्र येताना पाहून अमोलनं पळ काढला.
'माझी झाली नाही तर कोणाही होऊ देणार नाही'
तरुणाचं मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. मुलगी आणि आरोपी तरुण एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखत होते. मुलगी मैत्रिणींसोबत वाढदिवसाला गेली असता तिचा पाठलाग करुन आरोपी वाढदिवसाच्या ठिकाणी शिरला आणि तिला अॅसिड फेकून मारुन टाकेन, अशी धमकी दिली. त्यावेळी मुलगी घाबरली. तिने थेट पोलीस स्टेशल गाठत या मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहे.
मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
काही दिवसांपूर्वी पुण्यात प्रेमप्रकरणातून एका मुलीची हत्या करण्यात आली होती. तरुणाने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली होती. प्रेम प्रकरणाच्या श्वेता रानवडे असं 22 वर्षीय तरुणीचं नाव होतं. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हत्या करुन तरुणाने पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र हत्येच्या दुसऱ्याच दिवशी तरुणाचा मृतदेह मुळशीजवळ सापडला होता. त्या हत्येनं पुणे हादरलं होतं. ही घटना ताजी असतानात अॅसिड हल्ल्याची घटना समोर आल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मागील काही दिवसांपासून बलात्कार, विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोनवरुन धमकी, सायबर क्राईचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वेगानं वाढ होत आहे. त्यामुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.