पुणे : पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदारे (28 वर्षे) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. शुभदाच्या सहकाऱ्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (30 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला. पुणे शहरातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पैशाच्या वादातून हत्या
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभदा कोदारे ही पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये अकांऊटंट म्हणून काम करत होती. तिचा सहकारी कृष्णा कनोजा आणि तिच्यामध्ये पैशावरुन वाद सुरू होता. यातूनच आरोपीने हा हल्ला केला. आरोपीने शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. पण अतिरिक्त रक्त स्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून आर्थिक वादातून हे सगळं प्रकरण घडल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांची देवाण घेवाण झाली होती.
मंगळवारी संध्याकाळी शुभदा तिचे काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती. याच वेळी कृष्णा तिथे आला आणि त्याच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरलेले चोपर होते. त्याने शुभदा हिला अडवले आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला. हा घाव इतका गंभीर होता की शुभदा तिथेच कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही बातमी वाचा :