Maharashtra Pune News : पुणे : एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला. पुण्यातील (Pune Crime News) सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली. हाय टेंशन विजेच्या टॉवरमधून मेटल केबल चोरण्यासाठी तिघेजण चक्क 100 फुटांवर चढले. त्या तिघांपैकी एकाचा खाली पडून मृत्यू झाला आहे. कुटुंबियांना याबाबत माहिती नसल्यामुळे मित्रांनी आपल्या मृत्यू झालेल्या मित्राला जंगलात नेऊन पुरलं. एवढंच नाहीतर मित्रांनी या घटनेबाबत ना पोलिसांना माहिती दिली, ना त्यांच्या कुटुंबियांना. पण आपला मुलगा घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला, त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मित्र 13 जुलै रोजी वेल्हे तालुक्यातील रांजणे गावाजवळील बंद हाय टेंशन टॉवरमधून मेटल केबल चोरण्यासाठी गेले. तब्बल 100 फुट वरती चढले. मेटल केबल काढण्याच्या प्रयत्नात असताना तिघांपैकी एक मित्र 100 फुट अंतरावरुन थेट खाली कोसळला. एवढ्या उंचावरुन खाली कोसळल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारा बसवराज मंगरुळे (22) यांचा टॉवरवरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणी सौरभ रेणुसे आणि रूपेश येनपुरे अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.
11 जुलैपासून बेपत्ता होता तरुण, कुटुंबियांची पोलिसांत धाव
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारा बसवराज मंगरुळे याचा 100 फुटांवर खाली कोसळल्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतप घाबरलेल्या मित्रांना त्याला जंगलात नेलं आणि तिथेच त्याचा मृतदेह पुरला. याबाबत मित्रांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली नाही. तसेच, पोलिसांनाही काहीच सांगितलं नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मंगरुळेच्या कुटुंबीयांनी 11 जुलै रोजी रेणुसेसोबत पाबे गावात गेल्यानंतर तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी सांगितलं की, मंगरुळे, रेणुसे आणि येनपूरे ही धातूची केबल चोरण्यासाठी रांजणे गावाकडे गेले होते, मात्र टॉवरवरून पडून मंगरुळे याचा मृत्यू झाला.
मित्रांनी जंगलात नेऊन पुरलं
मंगळुरे 100 फुटांवरुन खाली कोसळल्यानंतर मित्रांनी त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी पाबे जंगलात पुरलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींकडे मृतदेह नेमका कुठे पुरला? अशी विचारणा केल्यानंतर दोघांनीही ते ठिकाण दाखवलं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.