Pune Crime news : रात्री जोरात सुरु असलेला (police) स्पिकर बंद करा, असं सांगण्यासाठी गेलेल्या पोलिसांना (pune) धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. खडकी परिसरात ही घटना घडली आहे. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक अर्जुन समरत बेंदगुडे यांनी तक्रार दिली होती. त्यावरुन   पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सुमित सुभाष मिश्रा, रसल अ‍ॅल्वीस जॉर्ज, वृषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड (वय-23), सिद्धार्थ महादेव लोहान (वय-24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 


खडकी परिसरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने स्पिकर लावला होता. त्यावर जोरात गाणे वाजत होते. त्यावेळी नाचणाऱ्या तरुणांमध्ये वाद झाले होते. गाणं कोणतं लावायचं यावरुन वाद झाला होता. रात्री गस्त घातल असलेले पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. गाणं बंद करायला सांगितलं मात्र त्या मुलांनी पोलिसांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यानंतर पोलिसाने स्वत: जाऊन तो स्पिकर बंद केला. स्पिकर बंद का केला? असा प्रश्न विचारत आरोपी पोलिसांच्या अंगावर धावून गेले. आरोपींनी पोलिसांची कॉलर धरुन दमदाटी केली. पोलिसांच्या कामात बाधा आणल्याने आरोपींना अटक केली आहे. 


पोलिसांना मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये वाढ 

पोलिसांना मारहाणी केल्याच्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांच मारहाणीचे प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी  पुण्यातील वकिलाने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील मार्केट यार्ड  परिसरात ही घटना घडली होती. वकिलाने पोलीसाच्या अंगावर धावून जाऊन मुठीतील चावीने मारहाण केली होती. यात पोलीस जखमी झाले होते. प्रतीक अंकुश तावरे असं या वकिलाचं नाव होतं. मार्केट यार्ड पोलिसांनी  प्रतीक अंकुश तावरे या 35 वर्षीय वकिलाला अटक केली होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरुन वकिलावर कारवाई करण्यात आली होती.


पोलिसही अुरक्षित
पुण्यात सतत पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहे. आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांवरच अनेकांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहे. मागील दोन महिन्यातील ही किमान चौथी घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यासोबतच पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.