Ayush Komkar Murder case: पुण्यात टोळीयुद्धातून हत्या करण्यात आलेल्या आयुष कोमकर याच्यावर सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये 9 गोळ्या झाडून अवघ्या 19 वर्षांच्या आयुषची (Ayush Komkar) हत्या करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर गणेश विसर्जन असल्याने कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी दोन दिवस त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवला होता. अखेर काल संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोमकर (Ganesh Komkar) यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आणण्यात आले होते. त्यावेळी मुलाचा मृतदेह पाहून गणेश कोमकर धाय मोकलून रडला. वर्षभरापूर्वी पुण्यात वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला म्हणून आंदेकर गँगने आयुष कोमकरला ठार मारले. गणेश कोमकर, जयंत कोमकर आणि संजीवनी कोमकर हे वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपी आहेत.  ते सध्या न्यायालयीन कोठडी असून त्यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. काल गणेश कोमकरला मुलाच्या अंत्यविधीसाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते.

Continues below advertisement


आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारावेळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. या बंदोबस्तात गणेश कोमकरला स्मशानभूमीत आणले. त्यावेळी गणेश कोमकरने आयुषने त्याला पाठवलेले एक ग्रिटिंग कार्ड सर्वांना उंचावून दाखवले. गणेश कोमकर हा पोलिसांच्या गाडीतून उतरला तेव्हा त्याच्या हातात आयुषने पाठवलेले ग्रिटिंग कार्ड होते. यावर 'आय लव्ह यू पप्पा' असा मजकूर लिहला होता. गणेश कोमकर हा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना आयुषने आपल्या वडिलांना हे ग्रिटिंग कार्ड पाठवले होते. स्मशानभूमीत आयुषचा मृतदेह पाहून गणेश कोमकरला प्रचंड रडू कोसळले. या सगळ्यात त्याची काही चूक नव्हती. काही चूक नसताना माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली, असे गणेश कोमकर रडत म्हणाला. यावेळी सर्व कोमकर कुटुंबीयही रडत होते. 


Pune Crime news: पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरला पकडलं


आयुष कोमकर हत्याप्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी कालच बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली. बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली आहे.



आणखी वाचा


दुडम काकांचा फोन आला, मोठ्या मुलाला मारहाण...आयुषची आई धावत खाली गेली', लेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून हंबरडा फोडला; त्या दिवशी नेमकं काय घडलं?