Pune Crime: पुण्यात किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असताना पोलीस दलात भरती होण्यासाठी तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. सोमवारी सकाळच्या सुमारास घटना घडली. यामध्ये काही विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली असून, “तुमची लायकी नाही पोलीस होण्याची” अशा अपमानास्पद शब्दांत त्यांना हिणवण्यात आलं. भावी पोलिसांंवरच गावगुंडांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय.

Continues below advertisement


नेमकं घडलं काय ?


तळजाई टेकडी परिसरात दररोज अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेला शारीरिक सराव करत असतात. सोमवार सकाळीही नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी सराव करत होते. त्यावेळी अचानक दहा ते बारा जणांचा एक टोळकी तिथं आली आणि त्यांनी सराव करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अडवत मारहाण केली. विशेष म्हणजे यामध्ये मुलींचाही समावेश होता. काही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत टोळक्याने अपमानास्पद भाषेत धमकावले.


घटनेचा तपास सुरू


हल्लेखोर गावगुंड कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुला-मुलींसोबत अशा प्रकारे मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


या घटनेनंतर संबंधित विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक थेट सहकारनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली असून, संबंधित गुंडांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.


लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर पहाटे दरोडा


पुणे शहरातल्या जांभुळकर चौक परिसरात लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या कौशल्या बंगल्यात पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान दोन अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून थेट त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश करत जबरदस्तीने कपाटातून तब्बल 40 तोळे सोने आणि 8.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली.


या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पुणे शहरात सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे, लष्कराच्या अधिकाऱ्याच्याच घरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


कपाटाची चावी मागून संपूर्ण दागिने व रोकड उचलली


घटनेच्या वेळी विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल हे आपल्या बेडरूममध्ये झोपले होते. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्या खोलीत घुसले. त्यांनी कमांडर यांच्या तोंडावर हात ठेवत त्यांना झोपेतून जागं केलं आणि थेट सोन्याची चौकशी करत हलू नये, असा दम भरला. दोघांच्या हातात हातोडी, हेक्सा ब्लेडसारख्या लोखंडी वस्तू होत्या. थोड्याच वेळात त्यांनी कपाटाची चावी मागून संपूर्ण दागिने व रोकड उचलली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. आरोपींचा शोध घेतला जात आहे. 


हेही वाचा: