Pune Crime News : पुणे कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ससूनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयामधील डॉक्टरांवर कारवाई झाली होती. मात्र, तरी देखील ससून रुग्णालय प्रशासन सुधारायचं नाव घेत नाहीत. हेच या दोन डॉक्टरांच्या अटकेने सिद्ध झालं आहे. डॉक्टरांच्या या 'कार'नाम्यानं मात्र ससूनच्या विश्वासार्हतेलाच तडा गेला आहे.
डॉक्टरांच्या 'कार'नाम्यानं ससूनची विश्वासार्हता धुळीस मिळाली!
डॉ. अजय तावरे, पुण्याच्या ससून सरकारी रुग्णालयाचे काही दिवसांपूर्वीपर्यंत वैद्यकीय अधीक्षक होते. मात्र आयसीयूमधील एका रुग्णाचा उंदीर चावल्यानं मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांची बदली करण्यात आली अन् फॉरेन्सिक, मेडिसिन ऍण्ड टॉक्सोलॉजी विभागाचा पदभार तावरेंकडे देण्यात आला. मात्र जेव्हा कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला मेडिकल रिपोर्टसाठी ससूनमध्ये आणण्यात आलं, तेव्हा त्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रताप तावरेंनी केला. रजेवर असताना तावरेंनी ससूनच्या अपघात विभागाचे प्रमुख डॉ. श्रीहरी हरलोरांना फोन केला अन् अल्पवयीन मुलाचे खरे नमुने डस्टबिनमध्ये फेकून दुसऱ्याचे नमुने चाचणीसाठी पाठविण्याचा प्रताप केला.
ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे नमुने बदलले
पोर्शे कार अपघाताचं प्रकरण हे संवेदनशील होतं. असं असताना ब्लड रिपोर्ट समोर येत नसल्यानं वारंवार याबाबतचा प्रश्न पुणे पोलिसांना विचारला जात होता. मात्र रिपोर्ट यायला उशीर होतोय, इतकंच उत्तर पोलिसांकडून दिलं जात असल्यानं ब्लड रिपोर्टमध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय येऊ लागला. ससूनच्या डॉक्टरांकडून काही काळंबेरं होण्याची शक्यता आहे, हे पुणे पोलिसांनी गृहीत धरलं आणि अल्पवयीन मुलासह वडील विशाल अग्रवालचे रक्ताचे नमुने डीएनए टेस्टसाठी दुसऱ्या लॅबमध्ये पाठवले. त्याचे रिपोर्ट ससूनमधील रिपोर्टशी पडताळून पाहिले असता, ससूनमधील डॉक्टरांचा कारनामा समोर आला.
ड्रॅग माफिया ललित पाटील प्रकरणातही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अटक
ड्रॅग माफिया ललित पाटीलला याच ससून रुग्णालयात फाईव्ह स्टार ट्रीटमेंट मिळाली, किंबहुना याच ससून रुग्णालयाला त्याने ड्रॅग माफियाचा अड्डा बनवला होता. या आरोपांवरून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली, काहींवर निलंबनाची कारवाईही झाली. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलं. ज्यामुळं ससूनची विश्वासार्हता धुळीस मिळाली. मात्र यातून ससून प्रशासनाने काही धडा घेतलाच नाही, हे डॉ. तावरे आणि हरलोरांच्या अटकेने स्पष्ट झालं आहे.
ससून रुग्णालयाच्या विश्वासार्हतेला तडा
ससून जिल्हा रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि इतर जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक आशेच स्थान म्हणून मानलं जातं. म्हणूनच कोट्यवधींचा निधी ससूनला दिला जातो, हे पाहून ससूनमध्ये पोस्टिंग मिळविण्यासाठी उच्च पातळीवर पैशांची देवाण-घेवाण होते. एकदा का इथं पोस्टिंग मिळाली की, मग इथं कसा कारभार चालतो, हे या प्रकारातून समोर आलं आहे.
आजवर ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप झाले, अनेक डॉक्टर निलंबित झाले पण, आता थेट डॉ. अजय तावरेंसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट अटक झाल्यानं आणि इतक्या संवेदनशील प्रकरणातील आरोपीचे रक्ताचे नमुनेचं बदलल्यानं ससूनची उरली-सुरली अब्रू धुळीस मिळाली आहे. मात्र, यातून नाचक्की फक्त ससूनची झाली नाही तर, आपल्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचं नाक देखील कापलं गेलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :