नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. झिंगाबाई टाकळी येथील निवासस्थानी प्रमोद यांनी आज दुपारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, त्यामध्ये घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
आजारपणाला कंटाळून प्रमोद मेरगुवार यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे रवाना करून तपास सुरू करण्यात आला आहे..
प्रमोद यांना काही महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. उपचारानंतर त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना काळी बुरशी (ब्लॅक फंगस) च्या आजाराने ग्रासले होते. उपचारानंतर सुद्धा प्रमोद यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता तर दुसरा डोळा 80% खराब झाला होता. आजारपणामुळे प्रमोद हे मागील काही दिवसापासून ते वैद्यकीय रजेवर होते आणि आजारपणाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असं बोललं जातं आहे.