शहापूर : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात (Kasara Railway Station) कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासाठी चित्रफित तयार करणाऱ्या नाशिक (Nashik) येथील दोन तरूणांना रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (20), रितेश हिरालाल जाधव (18) अशी अटक आरोपींची नावे आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दहा दिवसांपूर्वी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये बेकायदा घुसून आरोपी राजा आणि रितेश यांनी एक चित्रफित तयार केली होती. या चित्रफितीमध्ये ते मोटरमन असल्यासारखे आणि तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. 


रील्स बनवणारे दोन तरुण ताब्यात 


ही चित्रफित या तरूणांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून ही चित्रफित तयार करण्यात आल्याने रेल्वेच्या सायबर सुरक्षा विभागाने समाज माध्यमांतील या चित्रफितीच्या अनुषंगाने आरोपींचा तपास सुरू केला होता. रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही चित्रण, इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी या दोन्ही तरूणांची ओळख पटवली. ते नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजले. रेल्वे सुरक्षा बळ आणि स्थानिक पोलिसांनी नाशिकमध्ये या तरूणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. हे दोन्ही तरूण नाशिकमधून अटक केले.


यापूर्वीही एकाला अटक 


या तरूणांनी कसारा रेल्वे स्थानकातील कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून बेकायदा चित्रफित तयार केल्याची कबुली रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिली. पोलिसांनी त्यांच्या दोषारोप ठेऊन त्यांना अटक केली. असाच प्रकार यापूर्वी गुलजार शेख याने करून रेल्वे रुळाशी छेडछाड केली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणणारी, रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणारी आणि रेल्वे कायदे आणि नियमांचे उल्लंघन करणारी अशी कृत्ये करू नये, असे आवाहन रेल्वेने केले आहे. 


थेट संपर्क साधण्याचे आवाहन


रेल्वेच्या आवारात कोणीही असे कृत्य करत असल्यास 9004410735 किंवा 139 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि प्रवासी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत, असे रेल्वेने म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ratnagiri Love Story : इन्स्टावर प्रेम; प्रेमासाठी पंजाबहून कोकण आणि 'बेवफा' प्रेमाचा थरारक प्रवास


कुरियरद्वारे कोट्यवधीच्या अमली पदार्थांची तस्करी; एनसीबी कडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना ठोकल्या बेड्या