PNB Bank Scam : पीएनबी बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी आणि इतरांचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मेहुल चोक्सी सध्या परदेशात लपून बसला आहे. 


ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही घोटाळ्यातील मुख्य लाभार्थी असल्याचे ईडीने म्हटले आहे. प्रीती चोक्सीही वर्ष 2017 पासून अँटिग्वामध्ये पतीसोबत लपून बसली असल्याचेही ईडीने म्हटले आहे. 


मेहुल चोक्सी, त्याची पत्नी आणि त्यांच्या कंपन्यांसह सहा जणांविरुद्ध मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं हे दुसरे पुरवणी आरोपपत्र आहे. जवळपास 13 हजार 500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक  घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीला भारतात हवा असलेला चोक्सी फरार झाला होता. त्यानंतर मेहुल चोक्सीला मागील वर्षी 26 मे रोजी डॉमिनिकात अटक झाली होती.


चोक्सीच्या वकिलांनी दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पसच्या सुनावणीनंतर डोमिनिकन कोर्टाने त्याच्या हद्दपारीवर प्रतिबंध केला होता. फरार आरोपी चोक्सी 4 जानेवारी 2018 पासून अँटिग्वामध्ये राहत असून  सीबीआय आणि ईडी, त्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत. फरार व्यावसायिक नीरव मोदी हा मेहुल चोक्सीचा भाचा आहे. पीएनबी बँक घोटाळ्यात नीरव मोदी प्रमुख आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. 


ईडीकडून चोक्सीच्या मालमत्तेवर टाच 


ईडीने मेहुल चोक्सीच्या मालमत्तांवर याआधीच टाच आणली आहे.  मेहुल चोकसीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्ता ईडीने जप्त केल्या. या मालमत्तांमध्ये 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधलं ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधलं फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनही जप्त करण्यात आली. त्याशिवाय,  ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत.