मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. यामुळे मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेतला गेला. आता या प्रकरणी अंबोली पोलिसांनी (Amboli Police) एका महिलेला ताब्यात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धमकीचा फोन आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी कसून तपास सुरु केला.
धमकी प्रकरणी एका महिलेला अटक
आता पंतप्रधान नरेद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा फोन केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
याआधीही मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या