Thane Crime News : शेजारधर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय शाळकरी पीडित मुलीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटूंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेजारी राहणाऱ्या 37 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीवर गुन्हा दाखल होताच मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन करीत आत्महत्या केली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या 37  वर्षीय  आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार आणि  पोक्सो  कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शाळकरी मुलगी मुरबाड तालुक्यातील एका गावात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर 37 वर्षीय  आरोपीचा विवाह झाला असून पत्नी त्याला सोडून गेली असून  तो पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. त्यातच जानेवारी 2024  मध्ये मृत  आरोपीची वाईट नजर शेजारी राहणाऱ्या शाळकरी पीडित मुलीवर पडली होती. त्यातच आरोपीने  पीडित मुलीच्या  घरच्या मागे असलेल्या बाथरूममध्ये ती अंगोळ करतानाचे फोटो  त्याने आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केले. त्यानंतर तेच फोटो पीडित मुलीला दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली.  तसेच कुटूंबालाही मारण्याची धमकी  देऊन तिच्यावर  बाथरूममध्येच 18 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यत वारंवार बलात्कार करत होता. 


पोलिसांत धाव, पण... 


आरोपीच्या वाढत्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास असहाय्य होत असल्याने ती भयभीत होऊन शाळा आणि घरातही वावरत होती. त्यामुळे पिडतेच्या  आईने तिच्याकडे अधिक चौकशी केली. तिच्यावर घडत असेलला  धक्कादायक प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर 9 फ्रेबुवारी 2024 रोजी पीडित मुलीला घेऊन पीडितेच्या आईने मुरबाड पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार देण्यास गेली होती. मात्र त्या दिवशी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा न करताच पीडित मुलीला आणि तिच्या आईला पोलीस ठाण्यात दिवसभर बसून ठेवल्याचा आरोप पीडित मुलीने करत मुरबाड शहरातील जेष्ठ सामाजिक  कार्यकर्ते रवींद्र चंदने यांच्याकडे तसे  लेखी पत्र दिले. त्या पत्रानुसार  रवींद्र चंदने यांनी त्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर असलेल्या पोलीस कर्मचारी - अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीसाठी लेखी तक्रार दिली  आहे.  


गुन्हा दाखल होताच आरोपीनं आयुष्य संपवलं -


दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शाळकरी पीडित मुलीच्या  आईच्या तक्रारीवरून 37 वर्षीय शेजारी राहणाऱ्या आरोपीवर भादंवि कलम 376,(2)(एन ), 376 (3), 354(ए ) 354,( सी ) , 341, 504, 506, सह पोक्सो कलम 4, 6, 8, 12 नुसार 18 फेब्रुवारी 2024 रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधीकारी बाबर यांनी दिली आहे. शिवाय गुन्हा दाखल होताच आरोपीने  दुसऱ्या गावात राहणाऱ्या  एका मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन केल्याची माहितीही तपास अधिकारी बाबर यांनी  दिली आहे. मात्र या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.