Punjab Crime News: एका ट्रंकमध्ये तीन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानं सोमवारी पंजाब (Punjab News) पुरतं हादरलं. पंजाबच्या (Punjab) जालंधरमधील (Jalandhar) कानपूर गावात सोमवारी सकाळी तीन मुलींचे मृतदेह एका ट्रंकमध्ये आढळून आले. तिन्ही मुलींना त्यांच्या जन्मदात्या आई-वडिलांनीच ठार मारल्याची माहिती सध्या मिळत आहे. ट्रंकमध्ये ज्या तीन मुलींचे मृतदेह आढळून आले, त्या तिघीही सख्या बहिणी असून त्यांचं वय 5 ते 9 वर्षे होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगानं तपासाची सूत्रं हलवली. त्यानंतर पोलिसांच्या संशयाची सुई वडिलांवर येऊन थांबली आणि त्यांनी मुलींच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पण चौकशीअंती जे समोर आलं, ते सर्वांनाच हादरवणारं होतं. 


जालंधर ग्रामीण एसएसपी मुखविंदर सिंह भुल्लर यांनी सांगितलं की, कानपूर गावातील सुरिंदर सिंह यांनी त्यांचा भाडेकरू सुशील मंडलच्या 3 मुली हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ मुलींचा शोध सुरू केला. मकसूदन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिन्ही मुलींचा आसपासच्या परिसरात शोध घेतला, मात्र त्या सापडल्याच नाहीत.


ट्रंकमध्ये बंद केल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज 


यानंतर पोलीस तिन्ही मुलींचा पिता सुशील मंडलची चौकशी करण्यासाठी आले. पोलिसांनी सुशील मंडलची कसून चौकशी केली. त्यानंतर सुशील पोलिसांना एका बंद ट्रंकजवळ घेऊन गेला आणि त्यातच तिन्ही मुली असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तात्काळ ती ट्रंक खोलली, त्यात तिन्ही मुली मृत अवस्थेत आढळून आल्या. तिन्ही मुलींच्या तोंडातून फेस आला होता. पोलिसांनी तात्काळ मुलींची आई आणि पित्याला ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. 


तिघींचाही जीव घेतला अन् ट्रंकमध्ये बंद केलं 


सुशील मंडलचं म्हणणं होतं की, मुली खेळत होत्या. ट्रंकमध्ये बंद झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांना संशय आला. त्यांना सुशीलचं म्हणणं काही पटेना, त्यामुळे त्यांनी कसून चौकशी केली. त्यावेळी त्यानं तोंड उघडलं आणि त्यानं जे सांगितलं त्यामुळे संपूर्ण पंजाबसह देशच हादरला. सुशील मंडलनं सांगितलं की, त्यानं आणि त्याच्या पत्नीनं सकाळी दुधात विषारी पदार्थ मिसळून तिन्ही मुलींना जीवे मारलं आणि त्यानंतर त्यांना मोठ्या ट्रंकमध्ये बंद केलं. 


खूप मोठी चूक झाली, आरोपीची कबुली 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील मंडलची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे पती-पत्नी दोघांनीही असं टोकाचं पाऊल उचललं. आरोपींचं म्हणणं आहे की, त्यांच्या हातून खूप मोठी चूक झाली. पोलिसांनी मुलींच्या आई-वडिलांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


फुकटचा वडापाव दिला नाही, हॉटेल चालकावर डोक्यात थेट सिमेंटचा ब्लॉक घातला; आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल