गोंदियाः एका 35 वर्षीय महिलेवर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊन चौथा दिवस उजाडला तरी गोंदिया पोलिसांना तिसरा आरोपी अद्याप गवसला नाही. त्यामुळे गोंदिया पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पीडितेने नागपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे चौथ्या आरोपीचे संकेत दिल्याने भंडारा-गोंदिया पोलिसांना आता तपासाची चक्रे गतीने फिरविण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान गोंदिया पोलिसांच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
यावेळी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, 'सामूहिक बलात्कार पिडीतेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या का अशी आम्हाला शंका वाटते. शिवसेनेतर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचे होती. ती सुद्धा आम्हाला पिडीतेच्या कुटुंबियांना देऊ दिली नाही'. असा आरोप कायंदे यांनी लावला. तसेच भंडारा जिल्ह्यात सहा दिवस पोलीस अधीक्षक नव्हते. आधीचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना शिंदे गटाचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथून हटवले. नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक होण्याच्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली. कदाचित पोलीस अधीक्षक राहिले असते तर ही घटना अशा वळणावर गेली नसती, घटनेच्या तपासात दिरंगाई झाली नसल्याचे यावेळी कायंदे म्हणाल्या.
या घटनेवर बोलताना भंडारा जिल्ह्याचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणाले, एका महिलेसोबत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटने संदर्भात पोलिसांनी पहिल्याच दिवशी दोन आरोपींना अटक केली होती. एक आरोपी फरार आहे. त्याला शोधण्यासाठी 12 पथक तयार केले असून 200 पोलीस कर्मचारी त्या कामी लावण्यात आले आहे. या घटनेच्या पिडीतेची वैद्यकीय अवस्था पूर्णपणे बरी नसल्यामुळे पोलिसांचे बोलणे ( बयान ) झालेले नाही. प्रकरणाच्या तपासात आणखी आरोपींचा सहभाग समोर आल्यास त्यांनाही अटक केली जाईल'.
लोधी समाज आंदोलनाच्या तयारीत
पोलिसांकडून होणाऱ्या कासवगती तपासामुळे अद्याप आरोपी मोकाट फिरत आहे. तसेच फक्त राजकीय नेत्यांचे पर्यटन सुरु आहे. मात्र पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने लोधी समाज आक्रमक झाला असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.