Maharashtra Thane News: महाराष्ट्रातील ठाण्यात कुख्यात 'राईस पुलर मेटल' (Rice Puller Scam) घोटाळ्यात चार जणांनी 53 वर्षीय चार्टड अकाउंटटची (CA) 59 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ठाणे पोलिसांनी (Thane News) आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी लंडनमध्ये राहते आणि वेळोवेळी भारतात येत असते. पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये फसवणूक आणि इतर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.


उत्तम रिटर्न देण्याचं दाखवलं आमिष 


याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. पीडित व्यक्ती दोन वर्षांपूर्वी एका आरोपीला मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेटली होती आणि त्यानंतर ते सतत संपर्कात होते. नंतर, मुख्य आरोपीनं सीएची त्याच्या तीन मित्रांशी ओळख करून दिली. त्यांनी सीएला चांगल्या परताव्याच्या बहाण्यानं राईस पुलिंगमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.  


वर्षभरापूर्वी 59 लाख दिलेले 


पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पीडित व्यक्तीनं आरोपींना सप्टेंबर 2022 मध्ये 55 लाख रुपये आणि त्यानंतर 4 लाख रुपये दिले. तोपर्यंत पीडित व्यक्तीला आपल्यासोबत होणाऱ्या फसवणुकीबाबत काहीच कल्पना नव्हती. ज्यावेळी चारही आरोपींनी दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली, त्यावेळी व्यक्तीला संशय आला. पीडित व्यक्तीनं दिलेल्या पैशांवर कोणताही परतावा मिळाला नाही. त्यानंतर पीडित व्यक्तीनं पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. महाराष्ट्रात राईस पुलरच्या नावे यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


काय असतं राईस पुलर मेटल? 


राईस पुलर, म्हणजेच स्वतःकडे तांदूळ आकर्षित करणारा धातू, ज्याला 'कॉपर इरिडियम' असंही म्हटलं जातं. विजेच्या संपर्कात आल्यानं भात (तांदूळ) स्वतःकडे आकर्षित करून घेण्याची अलौकिक शक्ती विकसित होते, असा दावा केला जातो. तांदूळ आकर्षित (जे भांडं, वाटी, काच किंवा मूर्तीच्या आकारात असू शकतो) चुंबकीय शक्तीमुळे हा धातू अत्यंत मौल्यवान मानला जातो. नासा सारख्या वैज्ञानिक संस्थांनी उपग्रहांसाठी आणि अवकाशात ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला आहे, असा घोटाळेबाजांचा दावा होता. लाखो-कोटींच्या किमतींत हा धातू खरेदी केला जातो. या लालसेपोटी लोक लाखो-कोटी रुपयांना 'राईस पुलर' खरेदी करतात, तर त्यांच्याकडून 'राईस पुलर' विकत घेण्यासाठी कोणतीही संस्था येत नाही.


या टोळीच्या सदस्यांचं जाळं देशातील अनेक भागांत पसरलं आहे. राईस पुलरच्या नावाखाली एका रात्रीत श्रीमंत करण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं यापूर्वी उघडकीस आली आहेत. या टोळीचे ठग असंही सांगतात की, जे या विशेष धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करतात, त्यांचा व्यवसाय आणि संपत्ती दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होते. जे लोक 'राईस पुलर' चमत्कारी असल्याचा दावा करतात. गंडा घालताना हे ठग धातूचं प्रात्यक्षिकही दाखवतात. त्यामध्ये धातूकडे तांदूळ आकर्षित होतात.