Continues below advertisement

नवी मुंबई : सोशल मीडियावर पोस्ट टाकून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एपीएमसी पोलिसांनी (Navi Mumbai Crime) अटक केली आहे. त्याच्यावर 8 गुन्हे आणि 11 एनसी दाखल आहेत. मात्र दाखल गुन्ह्यात पोलिसांच्या तपासात अडथळा करण्यासाठी पोलिसांवर देखील तो सोशल मीडियाद्वारे दबाव टाकून तक्रारदारांना धमकवायचे काम करत होता. परमेश्वर प्रकाश सिंग (31) उर्फ मोनू असे पोलिसांनी अटक केलेल्या खंडणीखोराचे नाव आहे.

परमेश्वर सिंग हा सोशल मीडियावर एनएमटी न्यूज नावाने एपीएमसी आवारातील टपरी चालक, खाद्य पदार्थ विक्रेते यांच्याविरोधात पोस्ट टाकायचा. त्यानंतर संबंधित व्यवसायावर प्रशासनाला कारवाईसाठी भाग पाडून यापुढे तक्रार न करण्यासाठी महिना पैसे उकळायचा. अशा प्रकारे एपीएमसीसह शहरातील अनेक ठिकाणी खंडणीचे रॅकेट तो चालवत होता.

Continues below advertisement

काही गुन्ह्यात त्याच्या भावाचाही सहभाग निष्पन्न असून त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका पुरी भाजी विक्रेत्याकडे त्याने खंडणीसाठी दबाव टाकला होता. त्या विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तक्रारदार व साक्षीदार यांच्यावर तो दबाव टाकत होता.

शिवाय पोलिसांच्या तपासकामात अडथळा करण्यासाठी आपण पत्रकार असल्याचे भासवून तो पोलिसांवरही दबाव टाकायचा. मात्र गुन्हा दाखल होऊनही तपासात सहकार्य न केल्याने व साक्षीदारांवर दबाव टाकल्याप्रकरणी अखेर मंगळवारी रात्री त्याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

परमेश्वर सिंग याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून उत्तर प्रदेशातही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पत्रकार असल्याचे भासवत असल्याने झालेल्या कारवाईत त्याने आपण मजूर कामगार असून ठेकेदाराकडे काम करत असल्याचे मिर्झापूर न्यायालयात लिहून दिले होते.

त्यानंतर नवी मुंबईत त्याने आपला जम बसवायला सुरवात केली होती. त्यासाठी सुरवातीला काही पोलिसांच्याच सावलीत राहून आपली पत्रकार असल्याची छाप उमटवून खंडणी उकळण्यास सुरवात केली होती. 

आरोपीची वाढती दहशत व गुन्हेगारी कृत्ये लक्षात येताच पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेवरून वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे, सहायक निरीक्षक निलेश पाटील यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान त्याचा इतरही काही गुन्ह्यात सहभाग आहे का याचा अधिक तपास एपीएमसी पोलिस करत आहेत.

ही बातमी वाचा: