Nashik MNS: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Mahanagarpalika Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे (Sujata Dere) यांनी आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
सुजाता डेरे यांनी नाशिकमधून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मनसे पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला असतानाही त्यांनी अचानक आपली अधिकृत उमेदवारी मागे घेतली होती. त्यांच्या या अनपेक्षित माघारीमुळे राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आज त्यांच्या भाजप प्रवेशाने या माघारीमागील कारण स्पष्ट झाले असून, यामुळे मनसेला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
Sujata Dere: सुजाता डेरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हे आजपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये प्रचार सभांची सुरुवात होत आहे. शहरातील श्रद्धा लॉन्स, जुना गंगापूर नाका, हनुमानवाडी रोड येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याआधी श्रद्धा लॉन्स येथे भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांच्यासह इतर पक्षांतील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजाता डेरे यांना नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक 12 मधून मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवारासाठी माघार घ्यावी लागल्याने त्या नाराज झाल्याची चर्चा होती. या नाराजीमुळेच त्यांनी अखेर आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये भाजपमध्येही उमेदवारीवरून प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला होता. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत निषेध नोंदवला होता. काही कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात त्यांना गाजर देत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष उफाळून आला असल्याचे चित्र दिसून आले. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून जवळपास सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी समोर येत आहे. अशा परिस्थितीत सुजाता डेरे यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा