Nashik Crime : नाशिककर (Nashik) प्रवास करताना सावधान, ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्रवासात गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळीला (Robbery Gang) नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक चारचाकी, 13 ग्राम तोळे सोने असा 14 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवासात गुंगी देणारे औषध देऊन लूटमार करणारी महिला आणि तिच्या चार साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
एकीकडे आजकाल गुन्हेगारी (Crime) वाढत चालली असून एक ना अनेक प्रकारे लुट केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच नाशिक पोलिसांना महत्वाची टोळी हाती लागली आहे. देवीचा प्रसाद म्हणून पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन वाहनासह वाहनमालक अथवा चालकाला लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीतील प्रमुख संशयित महिला काजल उगरेजसह दिनेश कबाडे, निलेश राजगिरे, किरण वाघचौरे आणि मनोज पाटील यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासात अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान नाशिक शहरातील सिडकोतील बापू सूर्यवंशी यांचा वाहन चालविण्याचा व्यवसाय आहे. सूर्यवंशी यांच्याशी पंचवटी येथील काजल उगरेज हिने दूरध्वनीवरून संपर्क साधत सूरत येथे जायचे असल्याचे सांगितले. 12 मे रोजी ठरल्यानुसार उगरेज यांना पंचवटी परिसरातून पुढील प्रवासासाठी सूर्यवंशी यांनी वाहनात बसविले. दिंडोरी रोड परिसरात उगरेज यांचे काही मित्र वाहनात बसले. त्यांनी देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध टाकलेला पेढा वाहनचालक सूर्यवंशी यांना खाण्यासाठी दिला. पेढा खाल्ल्यानंतर सूर्यवंशी यांची शुद्ध हरपताच त्यांची स्विफ्ट कार, अंगावरील सोन्याचे दागिने, पाकीट असा एक लाख, 91 रुपये किंमतीचा माल लंपास केला. या प्रकरणी सूर्यवंशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
देवीचा प्रसाद पाहून खा.....
म्हसरूळ पोलीस आणि गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने या घटनेचा तपास करण्यात आला. तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे म्हसरूळ परिसरातील गुन्हेगार नीलेश राजगिरे याचा सहभाग असल्याचे लक्षात आले. राजगिरे यास 22 मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्हयात सहभाग असणारी काजल आणि मुख्य संशयित दिनेश कबाडे, किरण वाघचौरे, मनोज पाटील यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. कबाडे याला नाशिकरोड परिसरातून वाहनासह ताब्यात घेण्यात आले. संशयित महिला आणि अन्य संशयितांनाही ताब्यात घेतले.
टोळीची मुख्य महिला संशयित
दरम्यान म्हसरूळ हद्दीतील गुन्ह्यातील वाहन, 29 ग्रॅम सोने असा 14 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला.. म्हसरूळ, आडगाव, पालघर येथील कासा, औरंगाबाद येथील वाळुंज पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले, मुख्य आरोपी दिनेश कबाडे व किरण वाघचौरे याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संशयित काजल उगरेज हिचा पती कारागृहात आहे. दरम्यान पोलीस तपास सुरु असताना संशयितांकडे गुंगीकारक औषधे मिळाली असून 21 मे रोजी त्यांनी अशाच पद्धतीने एक कार पळविल्याची कबुली दिली. या प्रकरणी संशयितांना 26 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.