Nashik News Update : नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाया सुरू आहेत. कळवण शहरात रेशन धान्याची खुल्या बाजारात होणाऱ्या विक्रीचा पोलिसांनी आज भांडोफोड केलाय. कळवणमध्ये एका गोडावूनवर छापा टाकत 24 लाख रुपयांचा गहू ( wheat ) आणि तांदूळ  ( Rice) जप्त करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी संशयितांस ताब्यात घेण्यात घेतलं आहे.  


गेल्या काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायाविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पथके कार्यान्वित करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून दररोज जिल्ह्यात कारवाया करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आदेशीत केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक स्वरूपावर कारवाई करण्यात येत आहे.  


कळवण पोलिस ठाणे हद्दीत कळवण शहरातील कळवण ते देवळा रोडवर प्रभात स्टीलचे बाजुला असलेल्या गोडावुनमध्ये शासनाने गोरगरीब जनतेला रेशनवर उपलब्ध करून दिलेल्या तांदळाचा साठा खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवलेला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार  पोलिस पथकाने कळवण शहरात कळवण ते देवळा रोडवर प्रभात स्टीलच्या शेजारी उत्तराभिमुखी असलेल्या जोगेश्वरी या गोडावूनवर छापा टाकला.  या कारवाईत 24 लाख रुपयांचा गहू आणि तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या संशयित अजय मधुकर मालपुरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 


शासनाने गोरगरीब जनतेस अल्पदरात उपलब्ध करून दिलेल्या सुमारे 5 लाख 82 हजार रुपये किंमतीचा 19.40 टन तांदुळ, 3 लाख 80 रुपयांचा 15.20 टन गहू व घटनास्थळी मिळालेली वाहने असा एकूण 24 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम
मागील दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात पथकांद्वारे कारवाई केली आहे. दारूबंदी, जुगार, गुटखा, अवैध शस्रे बाळगणारे, हॉटेल धाबे कारवाई, गांजा बाळगणे आदी कारवाया केल्या आहेत. या सर्व प्रकरणात 749 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर 87 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या


Nashik Airport : अखेर पंधरा दिवसांनंतर नाशिक विमानतळ सुरु, नाशिक-दिल्ली-हैदराबाद पूर्ववत