नाशिक : जिल्ह्यातील शासकीय  रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच  खळबळ उडाली असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाचा शोध सुरू केला आहे. एका महिलेने बाळाची चोरी केल्याचा आरोप बाळाच्या आईनं केला आहे. आरोपी महिला ही बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 


सुमन अब्दुल खान  या मूळच्या मध्यप्रदेशच्या असून सटाणा तालुक्यात राहतात. 29 डिसेंबर रोजी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर बाळ आणि आई दोघांना वेगवेगळ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. 


डिस्चार्ज दिल्यानंतर बाळाची चोरी


शनिवारी बाळाला आणि महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. पण बाळाला मात्र दुसऱ्याच महिलेने चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बाळ चोरी झाल्यामुळे बाळाच्या आईने मात्र रुग्णालयातच टाहो फोडला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची मनंही हेलावल्याचं दिसून आलं. 


रुग्णालयात असताना पाच दिवसात एका अनोळखी महिलेनं खान कुटुंबीयांशी ओळख वाढवली. डिस्चार्ज देताना ती महिला वार्डमध्ये आली आणि खाली गाडी पर्यंत बाळाला घेऊन जाते असे सांगत तिने बाळाला घेतलं. नंतर बाळाला घेऊन तिने रुग्णालयातून थेट पळ काढला. 


घटना सीसीटीव्हीमध्ये कैद


आरोपी महिला ही बाळाला घेऊन जातात सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा शोध सुरू आहे.


ही बातमी वाचा: