Nashik Sinnar News नाशिक : इंस्टाग्राम (Instagram) या समाज माध्यमावर तलवारीचे प्रदर्शन करून व व्हिडिओ बनवून त्याचे रील प्रसारित करणे सिन्नरमधील दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Police) स्थानिक गुन्हे शाखेने या तरुणांचा शोध घेत त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत.


त्यांना या तलवारी उपलब्ध करून देणाऱ्यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिन्नर (Sinnar Crime News) शहरातील हॉटेल शाहू परिसरात एका पल्सर मोटारसायकलवर बसून हातात असलेली तलवार हवेत फिरवताना व्हिडिओ रिल बनवून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने माहिती दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंस्टाग्रामवरील या रीलची पडताळणी केली. ही रील बनवणारे व अपलोड करणाऱ्यांच्या वर्णनावरून गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नरमध्ये या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. 


दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात


सातपीर गल्ली परिसरात ते दोघे पोलिसांना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता रुषिकेश राजेंद्र बोरसे (24 रा. वावीवेस, सिन्नर) व धिरज बाळू बर्डे (21,रा. सातपीर गल्ली, सिन्नर) अशी त्यांची ओळख पोलिसांनी पटवली. रिल्स मधील तलवारीबाबत चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरातील ढोकेनगर भागात राहणारा गुरुनाथ भागवत हळकुंडे याच्याकडून घेतली असल्याचे सांगितले. 


पोलिसांकडून तलवारी हस्तगत


गुरुनाथ हळकुंडे यास हॉटेल शाहू परिसरातून पोलीस पथकाने ताब्यात घेतले. तलवारींबाबत विचारले असता त्याने दोन तलवारी पंजाब अमृतसर येथून विकत आणल्या असल्याची कबुली दिली. मनेगाव रोड येथील गाईच्या गोठ्यात या तलवारी लपून ठेवल्याचे त्याने सांगितले. पंचांच्या समक्ष या तलवारी पोलिसांनी गोठ्यातून जप्त केल्या आहेत.


सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


ही करवाई हवालदार सतिष जगताप, पोलीस शिपाई विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम, कुनाल मोरे यांच्या पथकाने  केली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) दोन रील स्टार व त्यांना तलवार पुरवणारा अशा तिघांविरुद्ध कायद्याने बंदी असलेले प्राणघातक हत्यार बाळगणे व त्याचे प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik : भागवत बंधूंचे चार कोटींसाठी अपहरण अन् सुटका, गुन्हा दाखल, एक जेरबंद


मोठी बातमी! करुणा शर्मांना मोठा दिलासा, ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय