नाशिक : आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) हद्दीतील विडी कामगार वसाहतीत रविवारी रात्री विशांत उर्फ काळू राजाराम भोये (24) या युवकाचा लहान मुलांच्या वादातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विडी कामगार वसाहतीच्या चौकात रास्ता रोको करीत संशयित आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे तर एक विधी संघर्षित बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर इतरांचा शोध सुरू आहे. तर या घटनेनंतर त्याच परिसरात गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. मात्र जाळपोळीची घटना आणि हत्येतील घटना या दोन वेगळ्या घटना असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.  


याबाबतची माहिती अशी की, विडी कामगारनगर परिसरातील काही रहवासी व विशांत भोये यांच्यात शुक्रवारी किरकोळ वाद झाले होते. या वादाची कुरापत काढून रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विडी कामगारनगरातील स्वामी समर्थ केंद्राच्या रस्त्यावर विशांत याला मच्छिंद्र जाधव याने धमकी देऊन जवळ बोलावले. त्याच्या सोबत असलेल्यांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने छातीवर वार करून त्याला जीवे ठार मारले, अशी तक्रार मयताचा भाऊ प्रशांत राजाराम भोये यांनी आडगाव पोलिस ठाण्यात केली. 


दोन रिक्षांची जाळपोळ


त्यांच्या तक्रारीनुसार एका विधीसंघर्षितासह नितीन पंजाबराव पवार, मच्छिंद्र उत्तम जाधव, मंदा मच्छिंद्र जाधव, रवींद्र साहेबराव मोहिते, रेखा रवींद्र मोहिते, गोरख उत्तम जाधव, सूरज रवींद्र मोहिते यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री घडलेल्या या घटनेनंतर विडी कामगार वसाहतीच्या परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या. दोन रिक्षांची जाळपोळ करण्यात आली. सकाळपर्यंत केवळ दोनच संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. जोपर्यंत सर्वच संशयितांना ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली आणि आंदोलनाचा इशारा देत चौकात जमावाने ठिय्या दिला. 


जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 


यानंतर आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर जमाव स्वामी समर्थ केंद्राकडे थांबून राहिला. जमाव आक्रमक झालेला बघून सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बडे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह पोलीस कर्मचारी व सीआरपीएफ जवानांचा ताफा परिसरात तैनात करण्यात आला होता. आता जाळपोळीची घटना आणि हत्येतील घटना या दोन वेगळ्या घटना असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.


आणखी वाचा


Dhule News : धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांनी फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना