Nashik News : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या परिसरात दोन रहिवाशांच्या भांडणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रहिवासी अपार्टमेंटमध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्याच्या वादावरून हां वाद विकोपाला गेल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, भांडणात एकाने बंदुकीने गोळी घालतो, अशी धमकी दिली असता मोतीलाल सानप यांचा उच्च रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोतीलाल सानप हे केंद्रीय सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधीक्षक या पदावरून निवृत्त अधिकारी होते. दरम्यान या प्रकरणी किरण आणि अर्चना कांकरिया यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कांकरिया कुटुंब फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस फरार कुटुंबाचा शोध घेत आहे.
किरकोळ वाद विकोपाला, धमकीच्या धसक्याने एकाचा मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, कांकरिया कुटुंबाने त्याच्या शेजारील सेवानिवृत्त सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधीक्षक असलेल्या मोतीलाल सानप यांना बंदुकीने गोळी घालतो अशी धमकी देत वाद केला. अपार्टमेंटमध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्याच्या वादावरून हां वाद विकोपाला गेला. दरम्यान, या वादात मोतीलाल सानप यांचा उच्च रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कांकरिया दांपत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड अधिक तपास करत आहे. मात्र क्षुल्लक कारणातून झालेला वाद विकोपाला गेल्याने आणि त्यात एकाच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आक्षेपार्ह फोटो काढून खंडणी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत एकांत स्थळी बोलवत संबंधित व्यक्तीचे आक्षेपार्य फोटो काढून त्याच्याकडून 12 लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण पुढे आले होते. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिणामी या प्रकरणी अधिक तपास करत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे शहरातील एक महिला आणि चार तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत संबंधित व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी बोलवून त्याचे आक्षेपार्य फोटो काढले. त्यानंतर त्याच्याकडून तब्बल 12 लाख रुपयांची मागणी केली होती. तर संबंधित पीडित व्यक्तीने याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संबंधित व्यक्तीकडून पैसे घेताना नंदुरबार येथून 4 जणांना ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने फसवणूक झाली असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे.
हे ही वाचा