Nashik Crime News : नातू म्हणजे आजीसाठी नाव आयुष्य असतो. आजी उरलेले आयुष्य नातवाबरोबर खेळण्याबागडण्यासाठी घालवत असते. मात्र नाशिकमध्ये आजी नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील हरसूल  शहरात एका नातवाने आजीलाच संपवल्याची घटना समोर आली आहे. नातवाला लहानाच मोठं करणाऱ्या नातवाकडून आजीला यमसदनी धाडले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  गंगुबाई रामा गुरव असे मयत झालेल्या आजीबाईचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हरसूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झिरवाळ  यांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल शहरातील इंदिरा नगर येथे आज मंगळवार (दि.23) रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घटना घडली असल्याचे समजले.


कुटुंबातील गंगुबाई रामा गुरव (वय 70) या आजीबाई आपल्या नातूसह राहतात. आज सकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या वादातीत नातू दशरथ गुरव याने आजीच्या उजव्या डोळ्याजवळ हातात घातलेल्या लोखंडी कड्याच्या सहाय्याने वार केले आहेत. यात आजी  गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच हरसूल ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हरसूल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक झिरवाळ, पोलीस कर्मचारी जाधव अधिक तपास करीत आहेत.


नाशिक जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या डोके वर काढले आहे. चोरी, लूटमार, अपहरण, खून आदी घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अशातच आता ग्रामीण भागातही गुन्हेगारी फोफावत चालली आहे. जिल्ह्यातील येवला, देवळा, इगतपुरी आदी भागात गुन्हेगारीच्या अधिक घटना पहावयास मिळतात. तर आता हरसुलच्या घटनेने त्र्यंबक तालुक्यातील गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. 


पोलिसांचा जरब अधिक
दरम्यान त्र्यंबक हरसूल परिसरात मात्र जिल्ह्याच्या तुलनेने गुन्ह्याच्या घटना कमी होताना दिसून येतात. स्थानिक पोलीस याबाबत सतर्क असून शहरातील नागरिकांशी वेळोवेळी चर्चा करून वाद मिटवले जातात. त्यामुळे गुन्हेगारीला वाव मिळत नाही. मात्र काहीवेळा खुना सारख्या मोठ्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण होते.