Nashik Crime : मैत्रीत अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने मुलीस धमकावत आपल्या घरी नेल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News) 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन पठाण (रा. जाकिर हुसेन हॉस्पिटलजवळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयिताने अल्पवयीन मुलीशी मैत्री करीत हे कृत्य केले. गेल्या आठ महिन्यात संशयिताने अल्पवयीन मुलीला रिलेशन शिपमध्ये राहण्यास जबरदस्ती केली. 

मुलीने नकार देताच मुलाकडून ठार मारण्याची धमकी

मुलीने नकार देताच त्याने कुटूंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळे कॉलनीतील एका मेडीसीन एजन्सीत व बोट क्लबच्या आवारात घेवून जात तिचा विनयभंग केला. तसेच मुलीस तो महाविद्यालयातून परस्पर आपल्या घरी घेवून गेल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला. 

मुलगी घरी न परतल्याने कुटूंबीयांची पोलिसात धाव

रात्री बराच वेळ उलटूनही मुलगी घरी न परतल्याने कुटूंबीयांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची कुणकुण लागताच संशयिताने नातेवाईकांना सोबत घेत मुलीस कुटूंबीयांच्या स्वाधिन केले असून तिने आपबिती कथन केल्याने याप्रकरणी पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

तोतया पोलिसांनी दोघांना लुटलं 

दरम्यान, कांदा बटाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांना तोतया पोलिसांनी लुटल्याची घटना पेठरोडवरील आरटीओ परिसरात घडली. या घटनेत भामट्यानी अंगझडती घेत एकाच्या खिशातील तीस हजार रूपयांची रोकड लांबवली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादू चिमना भुसारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भुसारे हे त्यांचे मित्र यशवंत मल्हारी चौधरी यांना सोबत घेवून कांदा बटाटा खरेदीसाठी शहरात आले होते. बसचा प्रवास करून दोघे मित्र आरटीओ परिसरातील शारदा हॉस्पिटल समोरून शरदचंद्र मार्केट यार्डाच्या दिशेने पायी जात असताना ही घटना घडली. रस्त्याने दोघे मित्र पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या दोघांनी त्यांची वाट अडविली. पोलिस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी चेकिंगच्या बहाण्याने दोघा मित्रांची अंगझडती घेतली. यावेळी भुसारे यांच्या खिशातील बटाटे खरेदीसाठी आणलेली तीस हजाराची रोकड काढून घेत भामट्यांनी आरटीओ सिग्नलच्या दिशेने दुचाकीवर पोबारा केला. 

आणखी वाचा 

Pahalgam Terror Attack : माहेर पाकिस्तानात अन् सासर भारतात, 25 वर्षांपासून सहा महिलांचं नाशिकमध्ये वास्तव्य; पाकड्यांना चले जावचे आदेश दिल्यानंतर सुनांपुढे पेच, पुढे काय होणार?