Nashik Crime News नाशिक : समृद्धी महामार्ग अमली पदार्थांच्या तस्करीचा नवा अड्डा बनू पाहत आहे. समृद्धीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने महामार्गावर थांबलेल्या दोन वाहनांमधून तस्करी होणारा 42.96 लाखांचा सुमारे 214.800 किलो गांजा पकडला. सुरक्षारक्षकांना पाहून दोन्ही वाहनांसोबत असलेल्या इसमांनी अंधारात धूम ठोकली.


राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चव्हाणके, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सुरक्षा रक्षक आकाश सानप, ज्ञानेश्वर हेंबाडे संयुक्तपणे समृद्धी महामार्गावर गस्त घालण्यासाठी गोंदे टोल प्लाझा येथून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. खंबाळे शिवारात चॅनल क्रमांक 557 या ठिकाणी अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक व सुझुकी कॅरी छोटा हत्ती टेम्पो महामार्गावर मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर उभा होता.


अंधाराचा फायदा घेत दोन जण फरार 


त्या ठिकाणी वाहनांमधून काही गोण्या क्रॉसिंग करण्यात येत असल्याचे पथकाचे निदर्शनास आले. पोलिसांनी थांबून विचारपूस केली असता दोन्ही वाहनांसोबत असणारे इसम अंधाराचा फायदा घेत समृद्धीची सुरक्षा भिंत ओलांडून पसार झाले. या वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले. 


42 लाखांचा गांजा जप्त 


महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे प्रभारी मिलिंद सरवडे यांनी याबाबत वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना कळवले. पवार यांच्यासह उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, सचिन काकड, गोविंद सूर्यवाड, साहेबराव बलसाने, सचिन कहाने यांनी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. दोन्ही वाहनांमधून हस्तगत केलेल्या गोण्यांमध्ये असलेल्या गांजाचे वजन २ किंटल १५ किलो भरले. त्याची बाजारातील किंमत सुमारे ४२.९६ लाख रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या वाहनांची किंमत पंधरा लाख ४७ हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलीस संशयितांचा परिसरात शोध घेत होते.


दीड महिन्यात तीन कोटींचा मुद्देमाल जपत


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्याच्या आचारसंहितेच्या काळात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. अवैध मद्य आणि प्रतिबंधित गुटखा, असा सुमारे तीन कोटी ५३ लाख ५२ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सुमारे तीन हजार टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Dharashiv : धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळच चाकू हल्ल्यात एकाची हत्या, राजकीय वादाचं पर्यवसन हत्येमध्ये झाल्याने घटना


विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन करणं भोवलं, शिवसेना सचिव किरण पावसकरांसह 11 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल