Nashik: नाशिक शहरातील प्रसिद्ध सागर स्वीटमधून लाखोंची चोरी करणाऱ्या परराज्यातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित कामगार चोराकडून तब्बल 22 लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नाशिक शहरात चोरी, हाणामारी किरकोळ गुन्हे सतत घडत आहेत. डोळ्यांची पापणी लवता न लवता तोच चोरी, लूटमार होत आहे. नाशिक शहरातील सागर स्वीट येथून मागील आठवड्यात चोरीची घटना घडली होती. तब्बल 35 लाख रुपये चोरट्याने पळवून नेल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी दुकानातील कामगार, काम सोडून गेलेले कामगार यांची माहिती जमा करण्यास सुरूवात केली.
तसेच सागर स्वीट परिसरात असलेल्या बस स्थानक, रिक्षा स्टॅन्ड आदी ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे दुकानातील काम सोडून गेलेला उत्तर प्रदेश येथील कामगार विवेककुमार उर्फ अंजनी रामेश्वर प्रसाद याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार तपास सुरू केला असता संबंधितांची चौकशी करण्यात आली. विवेककुमार आणि त्याच्या साथीदारांनी ही घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले.
दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहिती समजली. त्यानुसार संशयिताच्या शोधासाठी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे गेले. येथून अखिलेश कुमार मनिराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. विवेककुमार सोबत घरफोडी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 22 लाख, 70 हजार रुपये हस्तगत केले. विवेककुमार याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली असल्याने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर त्यास हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
दरम्यान सागर स्वीटच्या चोरी प्रकरणात संशयित हा परराज्यात राहणारा आहे. शिवाय स्वीटसह इतर दुकाने पाहिली असता बहुतांश खाद्यपदार्थांच्या दुकानात बाहेरच्या राज्यातील कामगार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिक, खाद्य पदार्थ बनविणाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती जमा करावी, ते जेथील रहिवासी आहेत. त्यांच्या स्थानिक पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवा, अशी सूचना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार ढमाळ यांनी दिली. विवेककुमार हा सागर स्विट्समध्ये कामाला होता. कामावर असतांना पैसे कुठे ठेवले जातात किंवा अन्य तपशील मिळवला. आपल्या साथीदारांसोबत त्याने घरफोडीची योजना आखली. घरफोडी करण्याआधी क्षुल्लक कारण पुढे करुन त्याने नोकरी सोडली. आठ दिवसातच घरफोडी करत तो साथीदारासह मुद्देमाल घेऊन गावी गेला. मात्र शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली. त्यावरून या प्रकरणाचा उलगडा झाला.