Nanded News Update : नांदेड येथे बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम मांगूळकर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. श्याम गुप्ता आणि कौस्तुभ फरांदे या बांधकाम व्यावसायिकांना पत्र पाठवून एक कोटी रूपयांची मागणी मांगूळकर याच्याकडून करण्यात आली होती. या प्रकरणी गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक श्याम कामालकिशोर गुप्ता आणि त्यांचे भागीदार कौस्तुभ फरांदे यांना पत्राद्वारे एक कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र पुरुषोत्तम मांगूळकर यानेच पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेला संशयिता हा गुप्ता यांचा नातेवाईक असल्याची बाब समोर आली आहे. गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हिमायतनगर पालीस आणि आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने संशयित अरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मांगूळकर याच्याविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येनंतर नांदेड शहरात पत्राद्वारे खंडणी मागणाऱ्याची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी सर्तक झाले आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे अशा खंडणी बहाद्दरांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. बियाणी यांच्या हत्येनंतर धमकीचे फोन आणि पत्राद्वारे खंडणी मागण्याचे प्रमाण नांदेड जिल्ह्यात वाढले आहे. दरम्यान, या तपासात पोलिसांचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार होत असल्याचे मत तांबोळी यांनी व्यक्त केले आहे. व्यावसायिकांच्या जवळच्या किंवा नात्यातील व्यक्तीकडूनच असा फायदा उचलला जात असल्याचे पुढे आल्याचे तांबोळी यांनी सांगितले.
नांदेड येथे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यामुळे नांदेड येथील छोटेमोठे व्यावसायिक अद्यापही भीतीच्या छायेत व दहशतीत वावरत आहेत. हत्येनंतर संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता हे धमकेची दुसरे पत्र आल्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावणर निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या