नांदेड : एकीकडे महापालिका निवडणुका तोंडावर असताना नांदेडमध्ये मोठी घटना घडली आहे. नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण झाल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले आहेत. अपहरण करून आपल्याला जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला. अपहरणकर्त्यांनी आपला संतोष देशमुख करू अशी धमकीही दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. या मारहाणीत घोगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. आपल्याला झालेल्या मारहाणीमागे अजितदादांच्या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) आणि त्यांच्या सहकार्यांचा हात असल्याचा आरोप घोगरे यांनी केला.
सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जीवन घोगरे हे आपल्या घरातून काम निमित्ताने बाहेर निघाले. हडको येथील पाण्याचा टाकी जवळ त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांना दुसऱ्या गाडीत जबरदस्तीने बसवण्यात आलं. नंतर त्यांना अज्ञात स्थळी नेऊन जबर मारहाण केली. नंतर मुसलमानवडी जवळ जीवन घोगरे यांना सोडून देण्यात आले.
सात जणांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला. या मारहाणीमध्ये घोगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत तपासाची चक्र फिरवली.
Pratap Chikhalikar News : प्रताप पाटील चिखलीकरांचा हात, घोगरेंचा आरोप
या प्रकरणी पोलिसांना सात जणांना अटक केली आहे. जीवन घोगरे यांच्या फिर्यादी नुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर झालेल्या हल्लाचे मुख्य सूत्रधार हे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि प्रवीण पाटील चिखलीकर हे आहेत असा आरोप जीवन घोगरे यांनी एबीपी माझा सोबत बोलताना केला.
'चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस' अशी धमकी अपहरणकर्त्यांनी आपल्याला दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर आरोप करताना जीवन घोगरे म्हणाले की, "माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. असल्या गुंडाला तुम्ही मंत्री करणार का? माझा संतोष देशमुख करून टाकतो अशी सुद्धा धमकी त्यांनी दिली. जमिनी लुटायचे, कब्जे करायचे हे यांचे धंदे आहेत."
अशा गुंडांना मोठं करू नका, नांदेडमधील गुंडाराज बंद करा असं आवाहन जीवन घोगरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जीवन घोगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मंगळवारी नांदेडमधील सिडको भाग पूर्ण बंद पाळणार आहे. जीवन घोगरे यांना मारहाण करणाऱ्या सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरचे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे -
शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहंमद अफ्रोज फकीर ( चालक ), देवानंद भोळे.