नागपूर : यात्रा आणि यात्रेत येणारे रंगीबेरंगी फुगे (Balloon) हे लहान मुलांना आकर्षित करतात. पण हेच फुगे आणि या फुग्यात असलेला हेलियम गॅस जीवघेणाही ठरु शकतो. नागपुरातल्या (Nagpur) सिव्हील लाईन परिसरात रविवारी एक दुर्दैवी घटना झाली. एका फुगे विक्रेत्याजवळचा सिलेंडर फुटला. स्फोट एवढा भीषण होता की सिलेंडर हवेत अनेक फूट उंचीपर्यंत फेकला गेला आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या शिजानच्या डोक्यावर कोसळला. या घटनेत शिजानसोबत त्याच्या कुटुंबातील इतर दोन महिलाही जखमी झाल्या. तिघांना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी शिजानचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे मृत शिजान हा फुगेवाल्याच्या जवळ नव्हता. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा होता. तरीही या स्फोटात उडालेला सिलेंडर डोक्यावर कोसळून शिजानचा मृत्यू झाला. नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) अधिक तपास सुरू आहे.
प्रत्येक शहरात गर्दीच्या ठिकाणी फुगेविक्री करणारे कोणत्याही परवानगीशिवाय आणि प्रशिक्षणाशिवाय व्यवसाय करतात. त्यांच्याकडे असलेल्या सिलेंडरमध्ये नायट्रोजन किंवा हेलियम गॅस असतो. या सिलेंडरचा मेटेनन्सही केला जात नाही, त्यामुळं अशी फुगेविक्री जीवावर बेतू शकते. नागपुरातल्य़ा या दुर्दैवी घटनेनंतर तरी फुगेवाल्यांसदर्भात काही नियम तयार होतील अशी अपेक्षा आहे. जेणेकरुन पुन्हा अशी घटना घडू नये आणि अशी फुगेविक्री कुणाच्याही जीवावर बेतू नये.
फुगेवाला फरार -
नातेवाईकांसोबत बाजारात गेलेला शिजान आसिफ शेख हा चार वर्षाचा मुलगा रविवारी रात्री नागपुरात फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटात मृत्युमुखी पडला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर बेकायदेशीर रित्या फुग्यांमध्ये गॅस भरून विक्रीचा काम करणारा फुगेवाला फक्त घटनास्थळावरूनच नाही तर त्याच्या घरातूनही कुटुंबासह फरार झाला आहे.
नेमकं घडलं काय ?
नागपूरातील सिविल लाईन्स परिसरात जुन्या व्हीसीए ग्राउंडजवळ काल रात्री अशाच एका फुगे विक्रेत्या जवळचा सिलेंडर फुटला. स्फोट एवढा जोराचा होता की सिलेंडर हवेत अनेक फूट उंचीपर्यंत फेकला गेला. आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबीयांसोबत उभ्या असलेल्या शिजानच्या डोक्यावर कोसळला. या घटनेत शिजानसोबत त्याच्या कुटुंबातील इतर दोन महिलाही जखमी झाल्या.. तिघांना तातडीने मेयो शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र डॉक्टरांनी तपासून शिजानचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या स्फोटात फारिया हबीब शेख (वय 28 वर्षे), अनमता हबीब शेख वय (24 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत.
तज्ञांनी काय सांगितलं ?
तज्ञांच्या मते प्रत्येकच शहरात गर्दीच्या ठिकाणी फुगे विक्रीचा व्यवसाय करणारे कोणत्याही परवान्याशिवाय आणि प्रशिक्षणाशिवाय व्यवसाय करत असतात. त्यांच्याकडील सिलेंडरमध्ये नायट्रोजन किंवा हेलियम गॅस असते. या सिलेंडरचे मेंटेनन्स केले जात नाही. त्यामुळे त्याचा स्फोट होणे किंवा गर्दीच्या ठिकाणी गॅस गळती होते. फक्त फुगे खरेदी करण्यासाठी आलेल्या लहान मुलांसाठीच नाही तर शिजानसारख्या निर्दोषांसाठीही धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने फुगेवाल्या संदर्भात काही नियम तयार करणे आवश्यक आहे. तसेच पालकांनीही फुगेवाल्यांच्या जवळ उभे असताना सावध राहण्याची गरज आहे.