Nagpur News: नागपूर : लहान बहिण बेपत्ता झाल्याने निराश झालेल्या तरुणाने स्वतःचेच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या बचावासाठी सरसावलेल्या मित्रासाठी हा प्रयत्न काळच ठरला. दोन सख्ख्या भावांनी आपल्या मित्रांच्या हातातून चाकू (Crime News) काढत त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटित एका भावाच्या गळ्यावर चाकूचा घाव बसल्याने त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्वर (Nagpur News) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी तरुणाला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
बहिण बेपत्ता असल्याने भाऊ तणावात
रोहित ज्ञानेश्वर खारवे असे 24 वर्षीय संशयित आरोपीचे नाव असून तो नागपूरच्या प्रेमनगर, झेंडा चौक येथील रहिवासी आहे. तर शुभम प्रमोद करवडे असे 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव असून तो इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. तो अमरावतीचा रहिवासी असून तो मनीष प्रमोद करवडे (27) या आपल्या सख्ख्या भावासोबत पर्ल हेरिटेज बंगला विहीरगाव येथे राहत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी रोहितची बहीण गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता होती. ती मिळत नसल्याने तो फार तणावात होता.
गुरुवारी 25 जानेवारीला मनीष आणि शुभमची आई बाहेरगावी गेली होती. माझ्या बहिणीचा शोध घेण्यासाठी कुणीही मला मदत करत नसून यासाठी मी एकटाच जबाबदारी आहे. मी नसेल तर कुठलाही त्रासच होणार नाही, असे रोहित दोन्ही भावांजवळ बोलला होता. त्यावर दोन्ही भावांनी मिळून त्याची समजूत काढली. त्यानंतर तो काही वेळ शांत होता. मात्र थोड्या वेळाने तो स्वयंपाक घरात गेला आणि घरातील चाकूने स्वतःवरच वार करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून शुभम आणि मनीष हे त्याला वाचविण्यासाठी धावले. मात्र तो ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हता.
अचानक गळ्यात चाकू गेला खुपसला
दरम्यान या तिघांमध्ये जोरदार ओढताण झाली. त्यात रोहितने मनीषला जोरदार धक्का दिला, त्यात मनीषच्या डोक्याला दुखापत झाली. तर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या शुभमच्या गळ्यात अचानक चाकू खुपसला गेला आणि रक्ताची धार लागली. हे पाहून रोहित आणि मनीष प्रचंड घाबरले. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या ऑटोचालकाच्या मदतीने जखमी शुभमला वैद्यकीय रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी रोहितविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या