Nagpur crime: चार-पाच तरुणांच्या टोळक्याने विद्यापीठ रोडवरील अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री घुसून तरुणाला मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. दोन समूहांमध्ये रस्त्यावर वाद झाल्याने तरुणांनी अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरच तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. टोळक्यापासून वाचण्यासाठी तरुण घराच्या दिशेने धावताच त्याला अडवत टोळीने तरुणास जबर मारहाण करत पहिल्या माळ्यावरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री नागपूर विद्यापीठ रोडवरील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटजवळ घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांचा दरारा कमी होतो आहे का? असा सवाल नागरिक करत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  

Continues below advertisement


नक्की झाले काय?


नागपूरच्या विद्यापीठ रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये घुसून तरुणांच्या एका टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली असून या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे.  29 आणि 30 नोव्हेंबर च्या मध्यरात्री विद्यापीठ रोडवर तरुणांच्या दोन समूहांमध्ये रस्त्यावर वाद झाले. या वादात एका तरुणांवर चार-पाच तरुणांनी हल्ला केला. आपला जीव वाचवण्यासाठी तरुण अपार्टमेंट च्या फीजवरच्या पहिल्या माळावर धावत चढला. त्याचा पाठलाग करत हल्लेखोरांनी त्याला पहिल्या माळ्यावर अडवले. चार-पाच जणांनी मिळून जबर मारहाण करून पहिल्या माळ्यावरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत  अपार्टमेंटमधील लोकांना आरडाओरडा ऐकून जाग आली. काहींनी हल्लेखोर तरुणांच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे हल्लेखोर पळून गेले. यात तरुणाला जबर मारहाण करण्यात आली असून नक्की कोणत्या वादातून हा राडा झाला हे अध्याप उघड झालेले नाही. 


पोलिसांचा दरारा कमी होतो आहे का? 


नागपूरच्या या अपार्टमेंट राड्यानंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यापीठ परिसरात अनेक तरुण पीजी किंवा हॉस्टेलसाठी राहतात. या परिसरात मध्यरात्री घरात घुसून मारहाण करण्याची घटना घडल्याने पोलिसांचा दरारा कमी होतो आहे का असा सवाल नागरिक करत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.