Nagpur Crime News नागपूर : धावत्या गाडीतून गर्दीचा फायदा घेत प्रवाशाचा मोबाईल चोरी करणे एका युवकाला चांगलेच भोवले आहे.  विशेष बाब म्हणजे या प्रकरणात नागपूर (Nagpur) लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला अवघ्या एका तासात पकडले आहे. ही घटना मंगळवारी गाडी क्रमांक 22352 पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये घडली.


या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी(Crime) विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे. चोरी गेलेला मोबाइल देखील परत मिळवून दिला आहे. अवघ्या तासाभरात पोलिसांनी संशयिताचा शोध लावल्याने  नागपूर (Nagpur News) लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. 


गर्दीच्या फायदा घेत चोरला मोबाइल 


बिहार राज्यातील नखारा येथील रहिवासी असलेला 30 वर्षीय राहुल कुमार गणेशराम हा मंगळवारी गाडी क्रमांक 22352 पाटलीपुत्र एक्स्प्रेसने, रामागुंडम ते दानापूर असा प्रवास करत होता.  या एक्स्प्रेसच्या तिसऱ्या जनरल कोचमध्ये त्याची सीट होती. या प्रवासादरम्यान गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन राहुल कुमार यांच्या खिशातून 17 हजार 500 रुपये किमतीचा मोबाईल चोरी करून चोराने पळ ठोकला. त्यानंतर राहुल कुमार यांचे संशयिताकडे लक्ष गेले असता त्याने आरडाओरड सुरू करत त्याच्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत गाडी सुटल्यामुळे संशयित आरोपी मोबाइल घेऊन खाली उतरला आणि त्याला पळून जाण्यात यश आले. 


तासाभरात संशयित जेरबंद 


ही बाब प्लॅटफार्मवरील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी याबाबत लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, श्रीकांत धोटे, चंद्रशेखर मदनकर, राहुल यावले, गिरीश राऊत सोने यांनी तत्काळ संशयित आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांना संशयित नागपुरातील गड्डीगोदाम गुरुद्वाराजवळ रेल्वे रुळावर बसून असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली.


या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ आपला मोर्चा आरोपीच्या दिशेने वळवला आणि त्याला ताब्यात घेतले. कमलेश राजेश जैदिया असे या 20 वर्षीय संशयित आरोपीचे नाव असून तो नागपुरातील बोरियापुरा शमीम ट्रेडर्सजवळ राहतो. पोलिसांनी संशयित आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने  गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीतील मोबाईल राहुल कुमारला परत मिळवून दिला आहे.    


महत्त्वाच्या बातम्या: