Nagpur Crime : नागपुरात (Nagpur) भरधाव बोलेरो पिकअपने भाजी बाजारात अनेकांना उडवत एका स्कूटी (Scooty)चालकाला 200 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. आशीर्वाद नगर भागातील भाजी बाजारात रविवारी (4 डिसेंबर) संध्याकाळी ही घटना घडली होती. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांनी बोलेरो चालकाला अटक केली आहे. घटनेच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे.


भाजी मार्केटमध्ये बोलेरो पिकअपचा धुमाकूळ
नागपूरच्या आशीर्वाद नगर परिसरातील भाजी बाजारात एका भरधाव बोलेरो पिकअप गाडीने एकापाठोपाठ एक पाच भाजीच्या ठेल्यांना उडवले होते. त्यात पाच भाजी विक्रेते जखमी झाले होते. भाजीच्या ठेल्यांना धडक देत बोलरो चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच गडबडीत त्याने समोर जाऊन एका स्कूटीला धडक देत सुमारे 200 मीटर फरफटत नेले होते.


अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून दोन्ही (ठेले उडवताना आणि स्कूटी फरफटत नेताना) घटना स्पष्ट दिसून येत आहेत. पहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव बोलेरो गाडी भाजी बाजारात घुसून भाजीचे ठेल्यांना उडवत असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजीच्या ठेल्यांना उडवल्यानंतर बोलेरो गाडी ठाकरे विद्यालयाकडे तब्बल 200 मीटरपर्यंत एका स्कूटीला फरफटत घेऊन जाताना दिसत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणाचाही जीव गेला नसून काही शाळकरी चिमुकले थोडक्यात बचावल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. 


चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं तपासात उघड
ही घटना घडली त्यावेळी बोलेरो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या आरोपी चालकाला अटक केली आहे. निष्काळजीपणे गाडी चालवून इतरांना दुखापत करण्याच्या आरोपात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागपुरात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ
नागपूर शहरासह ग्रामीण भागांतही रस्ते अपघातांची (Road Accident) संख्या वाढली आहे. अर्धवट रस्त्यांचे बांधकाम आणि पोलिसांचे वाहतुकीवरील नियंत्रणावर 'अर्थपूर्ण' दुर्लक्षामुळे नागरिकांचा बळी जात आहे. मंगळवारी (29 नोव्हेंबर) एकाच दिवसात जिल्ह्यात पाच जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. जिल्ह्यातील तीन विविध घटनांमध्ये दोन सख्ख्या भावांसह पाच युवकांवर काळाने झडप घातली. विशेष म्हणजे मृतांपैकी मो. मुस्ताफाचे वय अवघे अठरा वर्ष होते. तर इतर चारही युवकही पंचविशीच्या आतील होते.