Nagpur Crime : चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या फरार आरोपीच्या भावाचा पोलिसांनी (Nagpur Police) केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कन्हान इथे ही घटना घडली आहे. राहुल सलामे (वय 30 वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे. फरार झालेल्या आरोपींची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी राहुल सलामे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. परंतु पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर कन्हान इथे तणावाचं वातावरण आहे.


काय आहे प्रकरण? 


3 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या कन्हान भागात आरोपी खैलेश सलामे आणि शुभम सलामे यांनी आपल्या साथीदारांसह कन्हानच्या आठवडी बाजारात शस्त्राच्या धाकावर मोठ्या प्रमाणात दुकानांची तोडफोड केली होती. हातात शस्त्र घेऊन 12 युवकांनी धुमाकूळ घातला. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होऊन पळापळ झाली. यात चार महिलांसह आठ जण जखमी झाले होते. तरुणांनी परिसरातील वाहनांची तोडफोडही केली. या घटनेने कन्हानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी खैलेश सलामे, शुभम सलामेसह 12 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींनी पोबारा केला. 


या तोडफोडीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारवाईची मागणी केली होती. वाढता तणाव लक्षात घेता आरोपींची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी आरोपींचा भाऊ राहुल सलामे याला 3 फेब्रुवारीला ताब्यात घेतलं. परंतु 4 फेब्रुवारीला त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान 17 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत राहुल सलामेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.


कन्हान पोलिसांनी आरोप फेटाळले


दरम्यान कन्हान पोलिसांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळाले आहेत. "राहुल सलामेला दारु पिण्याची सवय होती. मद्यपानाच्या सवयीमुळे त्याला यापूर्वी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 15 फेब्रुवारी रोजी त्याने पोटात दुखत असल्याची तक्रार केली आणि पुन्हा एकदा मेयो रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. दारुमुळे राहुलचं यकृत आणि स्वादुपिंड निकामी झालं होतं, अशी माहिती कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली.


पोलीस बंदोबस्तात राहुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


राहुलचे नातेवाईक आणि नागरिकांनी त्याच्या पार्थिवासह रविवारी (19 फेब्रुवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास कन्हान पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. मात्र, कारवाई झाल्याशिवाय हटणार नाही, असं सांगत नातेवाईक आणि नागरिक तिथे तळ ठोकून होते. पोलिसांनी नातेवाईक आणि नागरिकांची समजूत घातली. त्यानंतर एका तासाने तणाव निवळला. पोलीस बंदोबस्तात राहुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.