Nagpur Crime News : मॅट्रोमोनी साईटवरून झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार (Nagpur Crime) करणाऱ्या संशयित आरोपीचा आणखी एक गुन्हा समोर आला आहे. त्याने याच पद्धतीने एका 37 वर्षीय तरुणीवर देखील अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राहुल उत्तमराव डाखोरे (33, रा. मोंढा, हिंगणा नाका) असे या संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी (Nagpur Police) त्याला अटक केली आहे. अवघ्या काही दिवसांत त्याच्यावर दाखल झालेला हा सलग दुसरा गुन्हा आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचे लग्न झाले असून देखील त्याने विवाह संकेतस्थळावरून तरुणींची फसवणूक करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. सोबतच राहुलने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, याचा अधिक तपास देखील केला जात आहे. 


मॅट्रीमोनी साईटवरील ओळखीतून तरुणीवर अत्याचार 


कोराडी येथील रहिवासी असलेली एका विधवा महिलेशी राहुलने विवाह संकेतस्थळावरून संपर्क साधला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधली. दरम्यान, शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यात ही पीडित महिला गर्भवती झाली. राहुल हा विवाहित आहे. मात्र अविवाहित असल्याचे भासवून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले. त्याने महिलेशी जबरदस्ती करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यामुळे महिला गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर ही बाब लक्षात येताच पीडित महिलेने याबाबत माहिती राहुलला दिली. मात्र याउलट राहुलने महिलेला धमकावून गर्भपात करण्यास भाग पाडले.


प्रकरण अगाशी आल्याने त्याने लग्नालाही नकार दिला. दरम्यान, राहुलने एमआयडीसीतील एका महिलेला अत्याचार करून तिच्याकडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचे महिलेला समजले. या प्रकरणी राहुलला अटक केल्यानंतर या महिलेने देखील पुढे येत कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. सोबतच राहुलने अशा प्रकारे आणखी काही तरुणींची फसवणूक केली आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहे.


सलग दूसरा गुन्हा दाखल


नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची राहुल सोबत एका विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली. दरम्यान त्यांच्यात बोलणे सुरू झाले आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान त्यांच्यात ओळख वाढून अधिक जवळीक निर्माण झाली. त्यानंतर राहुल तिला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. पुढे आपल्यात लग्न होणार असल्याने  तरुणीने देखील त्याला नकार दिला नाही. त्यानंतर राहुलने एका महागड्या कंपनीचा मोबाइल आणि इतर वस्तू घेण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र तरुणीने पैसे नसल्याचे सांगितल्यास राहुलने तिला बळजबरी केली. त्यानंतर तरुणीने राहुलला वेगवेगळ्या वेळी अडीच लाख रुपये दिले. मात्र तरुणीने राहुलला लग्नाची विचारणा केली असता तो कायम उडवा उडावीचे उत्तर देत होता.


आश्चर्याची बाब म्हणजे राहुलेचे लग्न झाले होते. ही बाब त्याने तिच्यापासून लपवून ठेवली होती. मात्र कालांतराने तरुणीने राहुलकडे लग्नाबाबत हट्ट केल्याने त्याने तरुणीला लग्नासाठी नकार दिला आणि पैसे देखील परत देणार नसल्याचे सांगितले. पीडित तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने तत्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून राहुल विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. त्यातूनच राहुलचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या