Nagpur Crime : केंद्रीय कोळसा मंत्र्यांचे नाव वापरुन नागपुरातील (Nagpur) एका मोठ्या कोळसा उद्योजकाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आंतरराष्ट्रीय टोळीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी असल्याचा दावा करणाऱ्या एका भामट्यासह तीन पत्रकारांचाही (Journalist) समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) चालणाऱ्या एका साप्ताहिकाचे दोन संपादक तसेच त्यांचा नागपुरातील रिपोर्टर हे तिघे नोव्हेंबर 2022 पासून नागपुरातील एका कोळसा व्यापाराच्या विरोधात बातम्या छापून त्याच्यावर खंडणीसाठी दबाव आणत होते. मात्र तरीही कोळसा व्यापारी खंडणी देत नाही, हे पाहून तिघांनी दोन महिन्यांपूर्वी वंश अग्रवाल नावाच्या एका भामट्याला आपल्यासोबत सहभागी करुन घेतले. वंश अग्रवाल हरिद्वारचा राहणारा असून त्याने कोळसा व्यापाऱ्याला तो केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांचा ओएसडी असल्याचा भास निर्माण केला आणि तुमच्याविरोधात मध्य प्रदेशातील संबंधित साप्ताहिकात छापून आलेल्या बातम्यांची दखल केंद्रीय कोळसा मंत्रालयाने घेतली असून लवकरच तुमच्या विरोधात कारवाई होणार असल्याचा भास निर्माण केला. कारवाई टाळण्यासाठी एक कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणीही केली.
सायबर पोलिसांकडून तपास, दोघांना बेड्या, दोघांचा एमपीमध्ये शोध सुरु
यासंदर्भात पीडित कोळसा व्यापाऱ्याने नागपूर पोलिसांकडे गोपनीयरित्या तक्रार दिली. यानंतर नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पियुष पुरोहित नावाच्या एका पत्रकाराला नागपुरातून तर केंद्रीय मंत्र्यांच्या कथित ओएसडी दक्ष अग्रवालला बंगळुरुमधून अटक केली आहे. इतर दोन संजय बघेल आणि संजीत बघेल या दोन संपादकांचा मध्य प्रदेशात शोध घेतला जात आहे. अटकेतील आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
टोळीकडून आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता : अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
पहिला हफ्ता म्हणून दहा लाखांची सेटलमेंट देखील झाली होती. परंतु त्याच दरम्यान आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली. कोळसा उद्योजकाच्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या टोळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय या टोळी याआधीही आणखी काही लोकांकडे खंडणी मागितली असावी, अशी शक्यता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वर्तवली. तसंच ज्यांची अशाप्रकारने फसवणूक झाली असेल त्यांनी समोर येऊन तक्रार करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
हेही वाचा
Nagpur Crime : हारिस रंगूनवालाविरोधात अपहरण, खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल